नाशिक ग्रामीण
विभागीय सायकलिंग स्पर्धेत व्ही.के.डी.च्या मोक्षदा रौंदळचे यश ; प्रथम क्रमांकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी कु. मोक्षदा नानाभाऊ रौंदळ हिने विभागस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे तिची राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जळगाव येथील तरसोद रोडवर आयोजित या स्पर्धेत १० ते १२ किलोमीटर मास स्टार्ट या प्रकारात मोक्षदा हिने उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले. तिच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
मोक्षदाला शाळेचे क्रीडाविभाग प्रमुख निलेश भालेराव, क्रीडाशिक्षिका चेतना शेवाळे व ऐश्वर्या जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे व प्राचार्य नितीन वाघ यांनी मोक्षदा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
मोक्षदाच्या या यशाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.



