नस्तनपूर शनि मंदिर परिसरात सहा घोणस सापांचा थरार; चार सापांना जीवदान!
Nandgson News
नस्तनपूर शनि मंदिर परिसरात सहा घोणस सापांचा थरार; चार सापांना जीवदान!
शेतकरी नाना पवार यांच्या चाऱ्याच्या गंजीत आढळले अति विषारी घोणस; साडेचार तास चालले रेस्क्यू ऑपरेशन, दोन साप बिळात पसार
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, दि. २४ नोव्हेंबर २०२६ : श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनि मंदिर परिसरात शेतकरी नाना पवार यांच्या शेतातील गुरांच्या चाऱ्याच्या गंजीत तब्बल सहा अति विषारी घोणस साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांनी साडेचार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चार घोणस सापांना सुरक्षितपणे रेस्क्यू केले, तर अन्य दोन साप बिळात शिरल्याने त्यांना बाहेर काढण्यात यश आले नाही.
मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी शेतकरी नाना पवार हे गुरांसाठी चारा काढण्यासाठी शेतात गेले होते. चाऱ्यावर टाकलेली ताडपत्री बाजूला करताच त्यांना तेथे साप दिसून आला. त्यांनी तत्काळ सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांना याबाबत माहिती देऊन मदतीसाठी बोलावले.
घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्पमित्र निकुंभ यांच्या निदर्शनास आले की, चाऱ्याच्या गंजीत अति विषारी घोणस जातीचे साप आहेत. सध्या घोणस सापांचा मिलन काळ सुरू असल्याने एकाच ठिकाणी अनेक साप असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता परिसरातील शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावून संपूर्ण चारा दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. चाऱ्याची गंजी टप्प्याटप्प्याने हलविताना एकापाठोपाठ एक असे एकूण सहा घोणस साप आढळून आले. साडेचार वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. यामध्ये चार घोणस सापांना सुरक्षितपणे पकडण्यात यश आले; मात्र उर्वरित दोन साप बिळात शिरल्याने अथक प्रयत्न करूनही त्यांना बाहेर काढता आले नाही.
यावेळी वन्यजीव संरक्षण संस्थेचे तालुकाध्यक्ष तथा सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांनी घोणस सापाच्या जीवनचक्राबाबत व संभाव्य धोक्याबाबत माहिती दिली. साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी हा घोणस सापांचा मिलन काळ असतो. या काळात मादी साप विशिष्ट गंध सोडत असल्याने त्याकडे आकर्षित होऊन त्याच प्रजातीचे अनेक नर साप त्या परिसरात येऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी सर्पदंशाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
शेतकरी बांधवांनी गुरांसाठी चारा काढताना, चाऱ्याच्या गंजीची ताडपत्री बाजूला करताना तसेच शेतातील लाकूड, गवत किंवा इतर साहित्य हाताळताना विशेष खबरदारी घ्यावी. कोणताही साप आढळल्यास स्वतः पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तातडीने प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभाकर निकुंभ यांनी केले.
या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान शनि मंदिर परिसरातील शेतकरी नाना पवार, राहुल चौधरी, मयूर आहेर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले. त्यांच्या मदतीमुळे चार अति विषारी घोणस सापांना सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.
छायाचित्रा कॅप्शन : नस्तनपूर शनि मंदिर परिसरातील शेतातील चाऱ्याच्या गंजीत आढळलेल्या घोणस सापांचे सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांनी केलेले रेस्क्यू ऑपरेशन.
महत्त्वाची सूचना : घोणस हा अत्यंत विषारी साप आहे. सर्पदंश झाल्यास जखम कापणे, विष शोषण्याचा प्रयत्न करणे किंवा झाडपाल्याचे उपचार करणे टाळावे. रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे.



