नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

दुष्काळी गावांचा दौरा; पाणी, चारा आणि नुकसानभरपाईसाठी पंकज भुजबळांचा प्रशासनाकडे आग्रह

Nandgaon News

दुष्काळी गावांचा दौरा; पाणी, चारा आणि नुकसानभरपाईसाठी पंकज भुजबळांचा प्रशासनाकडे आग्रह

माणिकपुंज धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आगामी अधिवेशनात वाचा फोडणार

वेगवान मराठी | मारुती जगधने

नांदगाव, दि. २० नोव्हेंबर
नांदगाव व मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना आमदार पंकज भुजबळ यांनी दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून शेतकरी व ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.

एरंडगाव, सावकारवाडी, जळगाव नि., पिंपरखेड, परधाडी आणि जातेगाव या गावांना भेट देत आमदार भुजबळ यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. दुष्काळामुळे शेती आणि पशुधनावर निर्माण झालेल्या संकटाची प्रत्यक्ष माहिती घेतली.

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत असल्याने आमदार पंकज भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून **माणिकपुंज धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी** केली. नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धताही कमी होत असून पशुधन जगविण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन गरजेनुसार चारा छावण्या सुरू करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत या बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आगामी अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठविणार असल्याचे पंकज भुजबळ यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई आणि आवश्यक सवलती मिळवून देण्यासाठी शासनाकडे ठोस मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून संकटाच्या काळात शेतकरी व ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.

केवळ पाहणी करून थांबणार नसून दुष्काळग्रस्तांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केली.

या दौऱ्यात माजी आमदार संजय पवार, तालुकाध्यक्ष विजय पाटील, रतन हलवर, विनोद शेलार, प्रसाद सोनवणे, रवींद्र घोडेसवार, अशोक पाटील, प्रताप गरुड, रामदास पवार, सनी निकम, आबा साळूंखे, राजू लाठे, गोरख जाधव, हबीब शेख, अर्जुन टिळेकर, पंढरीनाथ गायकवाड, दीपक खैरनार, दिगंबर सोनवणे, नारायण पवार, अरुण निकम, कचरू सरोवर, गौतम जगताप, विश्वास आहिरे, यशवंत शिंदे, शिवा सोनवणे, कमलेश पेहरे, अक्षय देशमुख, मनोज कोरडे, सुरेश गायकवाड, भरत जाधव, शंकर शिंदे, सचिन जेजुरकर, महेश पवार, विश्वास आहेर, एकनाथ आहेर, राजेंद्र आहेर, संतोष शिंदे आणि नितेश राजपूत यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!