नाशिक ग्रामीण

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या पाठपुराव्याला यश; देवळा नगरपंचायतीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, देवळा नगरपंचायत हद्दीतील विविध नागरी व सामाजिक विकासकामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय १८ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये श्रीराम व विठ्ठल मंदिर परिसरात सभामंडप बांधणे व उद्यान विकसित करण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपये, तर दुर्गामाता मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सामाजिक व सांस्कृतिक सुविधांना मिळणार चालना

या निधीतून देवळा शहरातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सभामंडपांची उभारणी होणार आहे. तसेच श्रीराम व विठ्ठल मंदिर परिसरात उद्यान विकसित झाल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काची सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे.

या दोन्ही कामांचा शंभर टक्के खर्च राज्य शासनामार्फत केला जाणार असून, कामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-निविदा काढून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

देवळा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामांसाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याने शहरातील विविध विकासकामांना गती मिळणार आहे.

निधी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले. मंजूर झालेली कामे दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!