गिरणानगर, सिद्धिविनायकनगर, mokal Nagar नागरी समस्यांचा विळखा!
Nandgaon News

गिरणानगर, सिद्धिविनायकनगर, mokal Nagar नागरी समस्यांचा विळखा!
रस्त्यावर मोठमोठे दगड; चेंबरला महिनाभरापासून झाकण नाही — गोकुळ नाहाटा यांची तक्रार
वेगवान मराठी | मारुती जगधने
गिरणानगर : गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीतील गिरणानगर, सिद्धिविनायकनगर व मोकलनगर परिसरात नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर मुरुमाच्या नावाखाली मोठमोठे दगड टाकण्यात आल्याची तक्रार असून, चेंबरला गेल्या महिनाभरापासून झाकण नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी तक्रारदार व सदन नागरीक गोकुळ नाहाटा यांनी केली आहे.
परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्यावर पसरलेले मोठमोठे दगड आणि खडी यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहन घसरणे, तोल जाणे आणि अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यावरही याचा परिणाम होत आहे.
महिनाभरापासून चेंबर उघडेच!
रस्त्यावरील चेंबरला महिनाभरापासून झाकण नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात उघडे चेंबर लक्षात न आल्यास पादचारी किंवा वाहनचालक अपघातग्रस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
वारंवार तक्रारी करूनही दखल नाही?
या परिसरातील समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुरुम टाकण्याच्या नावाखाली मोठे दगड टाकण्याऐवजी रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात
गिरणानगर ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, रस्त्यावरील मोठे दगड हटवून योग्य दर्जाचे दुरुस्तीचे काम करावे आणि चेंबरला तातडीने सुरक्षित झाकण बसवावे. तसेच परिसरातील नागरी समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोकुळ नाहाटा यांनी केली आहे.
आता ग्रामपंचायत प्रशासन या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना दिलासा देणार का, याकडे परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
फोटो कॅप्शन : गिरणानगर परिसरातील रस्त्यावर मोठमोठे दगड पसरले असून, चेंबरला झाकण नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.



