
नांदगावात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना;
किरणताई भालेकर यांची महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड
वेगवान मराठी | मारुती जगधने २३ ऑक्टोबर २०२६
नांदगाव : शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बौद्ध वंदना घेऊन महामानवाच्या विचारांना उजाळा देण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मातंग समाज महिला आघाडीच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी किरणताई भालेकर यांची निवड करण्यात आली.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याने भारतीय समाजाच्या इतिहासात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा नवा अध्याय सुरू झाला. वंचित, शोषित आणि पीडित समाजघटकांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नांदगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे, सामाजिक न्यायाची जाणीव निर्माण करणे आणि बंधुता व मानवतेची मूल्ये जपणे, हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
किरणताई भालेकर यांची निवड
या कार्यक्रमात किरणताई भालेकर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मातंग समाज महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून महिला संघटन मजबूत होऊन समाजातील महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
विविध समाजांचे पदाधिकारी उपस्थित
या कार्यक्रमास आरपीआयचे जिल्हा नेते देविदास
मोरे, ज्येष्ठ नेते नागसेन चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे, रवींद्र गरुड,, जिल्हा नेते प्रकाश काकळीज, राजु पवार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखे, भीमराव सोनवणे, चर्मकार समाजाचे नेते गणेश बडोदे, भिका खटके, धनगर समाजाचे नेते दिलीप निकम, होलार समाजाचे नेते राहुल हातेकर, आरपीआयचे शहराध्यक्ष राजु गुडेकर, बंडू निकम, हरिभl भालेकर, कामगार नेते छोटू पवार, अशोक बोराळे, विलास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. सामाजिक समता, न्याय आणि बंधुतेची मूल्ये आचरणात आणण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



