नाशिक ग्रामीणशेती

नांदगाव तालुका दुष्काळाच्या छायेत; पीक आणेवारीपूर्वीच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Nandgain news

नांदगाव तालुका दुष्काळाच्या छायेत; पीक आणेवारीपूर्वीच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वेगवान मराठी मारुती जगधने दिनांक 27 ऑगस्ट2026
नांदगाव : जून, जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे महत्त्वाचे तीन महिने उलटून जात असतानाही नांदगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३० ते ४० टक्के पावसाची नोंद झाल्याचे चित्र असून, उपलब्ध पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पिके उभी केली. मात्र, त्यानंतर पावसाने खंड दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. विशेषतः दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची गरज असताना पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यातील विहिरींचीही पाणीपातळी खालावली असून अनेक विहिरींना पुरेसे पाणी उपलब्ध नाही. असे गंभीर चित्र असतानाही काही शेतकरी आगामी पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याची लागवड करण्याची तयारी करत आहेत. मात्र, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने या लागवडीसमोरही मोठे आव्हान आहे.
नदी-नाले कोरडे; जलसाठेही आटले
पोळा सण जवळ आला असतानाही तालुक्यातील नदी-नाले, ओढे आणि पाझर तलाव कोरडे पडले आहेत. शाकंभरी नदीची स्थिती विशेषतः गंभीर असून नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. या नदीवरील धरणांमध्येही पाणीसाठा नसल्याचे चित्र आहे. नाग्या-साग्या धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. माणिकपुंज धरणात तुलनेने समाधानकारक स्थिती असली तरी तेथेही सुमारे ५० टक्के पाणीसाठा असल्याचे चित्र आहे.
पावसाने आणखी साथ दिली नाही तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असून, उपलब्ध जलसाठ्यांची स्थिती पाहता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.

पीक आणेवारीपूर्वी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

ऑगस्ट महिन्यात पीक आणेवारी जाहीर केली जाते. मात्र, पीक आणेवारी निश्चित होण्याची प्रतीक्षा न करता नांदगाव तालुक्यातील सद्यस्थितीचा तातडीने पंचनामा करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
अत्यल्प पाऊस, पिकांची खुंटलेली वाढ, दाणे भरण्याच्या काळात निर्माण झालेली पाण्याची टंचाई, कोरडी पडलेली नदी-नाले आणि पाझर तलाव तसेच धरणांमधील अपुरा पाणीसाठा या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पावसाअभावी धोक्यात आला असून, शासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर न थांबता प्रत्यक्ष शेतशिवारातील परिस्थितीची पाहणी करावी. पीक आणेवारी जाहीर होण्यापूर्वीच नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
तालुक्यातील पिकांचा तातडीने पंचनामा करावा.
प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
पिकांच्या नुकसानीची भरपाई तातडीने उपलब्ध करून द्यावी.
पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी.
उपलब्ध जलसाठ्यांचे नियोजन करून शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!