नाशिक ग्रामीण
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भऊर येथे गळक्या अंगणवाडीत चिमुकल्यांची शाळा !

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा: गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. मात्र, याच पहिल्या पावसाने भऊर पूर्व येथील बालवाडीच्या (अंगणवाडी) दुरावस्थेचा प्रश्न आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे.
पहिल्याच पावसात बालवाडीचा स्लॅब गळला; चिमुकल्यांचे हाल
पाऊस सुरू झाल्यापासून भऊर पूर्व येथील बालवाडीचा स्लॅब गळत आहे. त्यामुळे आज दि. ८ रोजी येथील लहान चिमुकल्यांना या गळत्या छताखाली बसून दिवस काढावा लागला. या परिस्थितीमुळे बालकांचे प्रचंड हाल झाले असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
…तरीही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष!
विशेष म्हणजे, येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या इमारतीच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार केली होती. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आणि अपेक्षित असतानाही, ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गळक्या अंगणवाडीची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



