नाशिक ग्रामीण
देवळा तालुक्यातील ‘चोरचावडी धबधबा’ पुन्हा ठरला जीवघेणा; २४ तासांनंतर चांदवडच्या युवकाचा मृतदेह सापडला

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील दहिवड (रामनगर) – चिंचवे शिवारातील चोरचावडी धबधब्याच्या डोहात बुडून बेपत्ता झालेल्या चांदवड येथील १८ वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर अखेर बुधवारी (दि. ८) दुपारी ३ वाजेच्या सुमारास मिळून आला आहे. ऋषिकेश शशिकांत संसारे (वय १८) असे मृत दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड येथील आयटीआय मध्ये शिक्षण घेणारे आठ महाविद्यालयीन मित्र मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ऋषिकेश संसारे हा पाण्यात उतरला. मात्र, धबधब्याच्या डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तातडीने मालेगाव येथील अनुभवी पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही ऋषिकेशचा पत्ता लागला नव्हता.
मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास राज्य आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध नसल्याने रात्रीचे शोधकार्य थांबवावे लागले होते. बुधवारी पहाटेच SDRF ची टीम आणि देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांची टीम पुन्हा घटनास्थळी दाखल झाले. पहाटे पासून मालेगाव येथील पट्टीचे पोहणारे आणि SDRF चे जवान बोटींसह पाण्यात उतरले होते. अखेर, आज दि.८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास म्हणजेच घटना घडल्यापासून जवळपास २४ तासांच्या प्रतीक्षेनंतर ऋषिकेशचा मृतदेह मिळून आला.
ऋषिकेशचा मृत्यूदेह हा देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असता, नातेवाईकांनी या मृत्यू बाबत शंका उपस्थित केल्याने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन व फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला.
चोरचावडी धबधबा ठरतोय ‘जीवघेणा’; प्रशासनाकडे कायमस्वरूपी बंदीची मागणी
चोरचावडी धबधब्यावर अशा दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक तरुणांना या डोहाने आपल्या कचाट्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच मालेगावच्या एका तरुणाचा येथे बुडून मृत्यू झाला होता.
त्याआधी वडाळी भोई येथील तीन निष्पाप युवकांनाही येथे आपला जीव गमवावा लागला होता. हा धबधबा वारंवार पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याने, प्रशासनाने आता केवळ सूचना फलक न लावता या धबधब्यावर कायमस्वरूपी प्रवेशबंदी करावी किंवा पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.



