महाराष्ट्र,देश

राज्याच्या मंत्रिमंडळासह आमदार राहुल आहेर दिल्ली दरबारी; कांदा उत्पादकांच्या मागण्यांवर अमित शाह यांच्यासोबत धोरणात्मक चर्चा!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित अडचणी, बाजारभावातील चढ-उतार आणि गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या व उच्चस्तरीय बैठकीत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कांदा उत्पादकांचे ज्वलंत मुद्दे आणि मागण्या अत्यंत प्रभावीपणे मांडल्या.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या धोरणात्मक बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, जयकुमार रावल, दत्तामामा भरणे आणि बाबासाहेब पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आमदार डॉ. आहेर यांनी शेतकऱ्यांची बाजू खंबीरपणे लावून धरली.

आमदार डॉ. राहुल आहेर यांनी बैठकीत मांडलेले प्रमुख मुद्दे आणि झालेले निर्णय:
 नाफेडचा खरेदी कोटा ६ लाख टनांपर्यंत वाढवण्याची मागणी: बाजारात कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासाठी ‘नाफेड’चा (NAFED) कांदा खरेदी कोटा तब्बल ६ लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याची आग्रही मागणी आमदार आहेर यांनी केली. यावर केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत.
 बाजार समिती आवारातच खरेदीची सक्ती; जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण: नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत केली जाणारी कांदा खरेदी ही सक्तीने बाजार समितीच्या (APMC) आवारातच पार पडणार असून या संपूर्ण प्रक्रियेवर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण व देखरेख असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होणार नाही, असा धोरणात्मक निर्णय या बैठकीत झाला.
 ५०० रुपये प्रति क्विंटल थेट अनुदान: अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा देण्यासाठी ५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विशेष थेट अनुदान देण्याबाबत बैठकीत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
 निर्यात अनुदानात (Export Subsidy) वाढ: जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला चांगला भाव मिळावा आणि निर्यात वाढावी, यासाठी कांद्यावरील निर्यात अनुदानात मोठी वाढ करण्याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली.

“बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध” – आमदार डॉ. राहुल आहेर
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,

“कांदा उत्पादक शेतकरी हा आपल्या राज्याचा आर्थिक कणा आहे. निसर्गाची अवकृपा आणि बाजारपेठेतील अनिश्चित धोरणांमुळे आमचा शेतकरी अडचणीत सापडला होता. बळीराजाला योग्य मोबदला आणि न्याय मिळवून देण्यासाठी मी राज्यात बैठकीत उपस्थित राहणे असो वा विधानसभेत प्रश्न मांडणे असो, सदैव कटिबद्ध आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी माझ्या सर्व मागण्या अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळानेही यात मोठी साथ दिली असून, लवकरच याचे सकारात्मक परिणाम जमिनीवर दिसतील.”

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने धोरणात्मक अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!