गारांचा मारा, पावसाचा कहर वादळाचा तडाखा; या भागातील शेतकरी पुन्हा संकटात
गारांचा मारा, पावसाचा कहर वादळाचा तडाखा; या भागातील शेतकरी पुन्हा संकटात

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला :दिनांक: 29मार्च /येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील नगरसुल राजापूर, जायदरे कोळगाव न्याहारखेडा आदी परिसरात आज अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि तुफानी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. काही वेळ सुरू असलेल्या या अवकाळी संकटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभा असलेला पीकाचा संसार क्षणात उद्ध्वस्त केला.
आधीच सुलतानी संकटामुळे (शेतीमालाला योग्य भाव नसल्याने) आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजावर आता अस्मानी संकटाचा घाला बसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
काढणीच्या उंबरठ्यावर असलेला गहू, डोंगळे व इतर पिके जोरदार वाऱ्यामुळे आडवी झाली असून, गारांच्या तडाख्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतं भुईसपाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून
पुन्हा एकदा मदतीच्या प्रतीक्षेत बळीराजा उभा आहे
“सुलतानी आणि अस्मानी या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे,” अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
धन्य ते सुलतानी संकट… आणि धन्य ते अस्मानी संकट…!
बळीराजाचा संघर्ष मात्र कायमचाच…
सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया :
“नगरसुल व राजापूर परिसरात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच बाजारभावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या बळीराजावर हे अस्मानी संकट म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
प्रशासनाने या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पंचनामे जलद गतीने पूर्ण करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, ही अत्यंत गरजेची बाब आहे.
तसेच भविष्यात अशा संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मजबूत संरक्षणात्मक उपाययोजना व विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
या कठीण काळात शासनाने बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, हीच अपेक्षा आहे.



