शिवगर्जनेने हादरला येवला; शिवसृष्टीत स्वराज्याचा विराट जयघोष!
शिवगर्जनेने हादरला येवला; शिवसृष्टीत स्वराज्याचा विराट जयघोष!

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव
येवला, दि. १९ फेब्रुवारी :-
आपल्या देशात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, परंतु ‘राजा’ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहतात ते छत्रपती शिवाजी महाराज. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत त्यांनी स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-धर्मातील लोकांना स्थान होते. त्यामुळे स्वराज्यातील प्रत्येक घडामोडीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असे. कुणावरही अन्याय होऊ नये, हीच त्यांची भूमिका होती. त्यांचा लढा कोणत्याही समाजाविरुद्ध नसून अन्यायाविरुद्ध होता, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त येवला येथील भव्य ‘शिवसृष्टी’ प्रकल्पात विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. याच प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ तसेच डॉ. शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटोळे, पप्पू सस्कर, अरुणमामा थोरात, भोलशेठ लोणारी, वसंत पवार, दत्ता निकम, राजेश भांडगे, सुरज पटणी, दीपक लोणारी, गोटू मांजरे, प्रविण बनकर, पारुल गुजराथी, नितीन काबरा, छाया क्षिरसागर, लक्ष्मीबाई जावळे, बंटी परदेशी, संजय बनकर, राजश्री पहिलवान, गुड्डू जावळे, मकरंद सोनवणे, भागवतराव सोनवणे, भागीनाथ पगारे, सचिन कळमकर, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नवनाथ काळे, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, प्रवीण पहिलवान, देविदास निकम, समाधान जेजुरकर, भूषण लाघवे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, दीपक गायकवाड, प्रा. संतोष राऊळ, वाल्मीक कुमावत, दीपक पवार, गणेश गवळी तसेच येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यातील प्रत्येक घटकाची समान काळजी घेतली. त्यांच्या सैन्यात सर्व धर्म आणि जातीतील लोकांना मानाचे स्थान होते. शेतकरी व महिलांना सन्मानाची वागणूक देणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांच्यावर अन्याय होऊ न देणे, ही त्यांची कटिबद्ध भूमिका होती. म्हणूनच त्यांना ‘रयतेचा राजा’ ही उपाधी लाभली. अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि सर्वसमावेशक स्वराज्य उभारणारा हा महान राजा आजही आपल्यासाठी दैवतच आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शिवसृष्टी प्रकल्प हा येवला शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक व पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. नव्या पिढीला शिवचरित्राची ओळख व्हावी आणि स्वराज्याच्या इतिहासातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम साकारण्यात आला आहे. येथे सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा, नयनरम्य कारंजा, अत्याधुनिक संग्रहालय, वाचनालय तसेच शिवकालीन इतिहास व मावळ्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणाऱ्या विविध शिल्परचना उभारण्यात आल्या आहेत. शिवसृष्टी ही केवळ वास्तू नसून इतिहास, प्रेरणा आणि संस्कारांचे केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘शाहिरी शिवदर्शन’मधून शिवचरित्राचा जाज्वल्य आविष्कार
जयंतीनिमित्त आयोजित ‘शाहिरी शिवदर्शन’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना इतिहासाच्या वैभवशाली कालखंडात नेले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्यांतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास, अद्वितीय शौर्य, रणनिती आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे साकारला.
शिवरायांच्या बालपणापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतचा संघर्ष, शत्रूंविरुद्धचे पराक्रम आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांचे जिवंत चित्रण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि वीररसपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. या कार्यक्रमातून न्यायनिष्ठ प्रशासन, स्त्री सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
“शिवसृष्टीच्या साक्षीने भावनांचा उद्रेक”
कार्यक्रमादरम्यान शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याची चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलेल्या त्या ऐतिहासिक क्षणांचा आढावा पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. प्रकल्पाच्या उभारणीतील प्रवास, लोकार्पणावेळीचा उत्साह आणि ऐतिहासिक स्मृतींचे दर्शन यामुळे वातावरण भावुक झाले.
यावेळी उपस्थितांच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



