आईसारखं दैवत नाही… मुलींना जन्माला येऊ द्या!” — ह.भ.प. अमोलजी महाराज कोटमे यांचा समाजाला जागवणारा संदेश
आईसारखं दैवत नाही… मुलींना जन्माला येऊ द्या!” — ह.भ.प. अमोलजी महाराज कोटमे यांचा समाजाला जागवणारा संदेश

वेगवान मराठी | एकनाथ भालेराव
येवला :दिनांक :15 :फेब्रुवारी /येवला तालुक्यातील पांजरवाडी (देवरे वस्ती, पांजरवाडी–अंदरसूल रोड) येथे महाशिवरात्री पर्वानिमित्त आयोजित त्रिदिनी श्री शिवमहापुराण कथा उत्साहात सुरू असून आज महाशिवरात्रीचा मुख्य दिवस भक्तीभावात साजरा होत आहे. पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त कथा श्रवण, हरिनाम संकीर्तन, रुद्राभिषेक व विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होत आहेत.
गोदाधाम, सरला बेट येथील ह.भ.प. अमोलजी महाराज कोटमे यांच्या ओजस्वी निरूपणाने भाविक भारावून गेले आहेत. त्यांनी भगवान भोलेबाबा यांच्या भक्तीचे महत्त्व सांगताना श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरण हेच जीवनातील संकटांवरचे खरे औषध असल्याचे स्पष्ट केले. “भगवंतावर कधीच शंका घ्यायची नाही. अखंड विश्वास ठेवा, भक्ती करा,” असा संदेश त्यांनी दिला.
“आईसारखं दैवत नाही; कन्यादानासारखं पुण्य नाही”
निरूपणादरम्यान महाराजांनी समाजप्रबोधनाचा ठोस संदेश देत कन्या भ्रूणहत्येविरोधात परखड भूमिका मांडली.
“या जगात आईसारखं दैवत नाही आणि कन्यादानासारखं पुण्य नाही. मुलींना सुखरूप जन्माला येऊ द्या. गर्भात लेकरांचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही,” असे ते म्हणाले.
मुलगी ही घराची लक्ष्मी असून तिच्या जन्माचा सन्मान करणे हेच खरे धर्मपालन असल्याचे त्यांनी नमूद केले. आई-वडिलांनी मुलींचे संगोपन प्रेमाने व अभिमानाने करावे, असे आवाहन करण्यात आले.
सतीमातेच्या त्यागातून स्त्रीशक्तीचा गौरव
निरूपणात सती माता यांच्या त्याग व निष्ठेचा उल्लेख करत स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला. स्त्री ही संस्कृतीची वाहक असून तिचा सन्मान राखणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले.
१६ सोमवार उद्यापन, काल्याचे कीर्तन व महाप्रसाद
महाशिवरात्रीनिमित्त १६ सोमवार व्रताच्या उद्यापनाचा विशेष कार्यक्रम आज पार पडत आहे. काल्याचे कीर्तन, हरिनाम संकीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.
नियोजनबद्ध आयोजन
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री. रमेश (गोपीनाथ) बाळनाथ देवरे व श्री. लक्ष्मण बाळनाथ देवरे (आर्मी) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. निमंत्रक म्हणून श्री. अंबादास रंगनाथ देवरे, श्री. अशोक अंबादास देवरे, श्री. अरुण चापाचंद देवरे, श्री. राहुल कारभारी देवरे आदी मान्यवर कार्यरत आहेत. ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व भक्तीमय वातावरणात सुरू आहे.
धर्म, भक्ती आणि समाजजागृतीचा संगम घडविणारा हा सोहळा पांजरवाडीच्या धार्मिक परंपरेला नवे बळ देत आहे.



