एक जीव वाचला… तरच सेवेचे सार्थक! लग्नाच्या आनंदातून सायगावात रुग्णवाहिका सेवेची जीवनदायी भेट
एक जीव वाचला… तरच सेवेचे सार्थक! लग्नाच्या आनंदातून सायगावात रुग्णवाहिका सेवेची जीवनदायी भेट

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव)
येवला: दिनांक: 15 फेब्रुवारी/समाजासाठी काहीतरी वेगळे आणि कायमस्वरूपी करण्याची जिद्द असेल तर आनंदाचे क्षणही समाजकारणाशी जोडता येतात,
याचे जिवंत उदाहरण येवला तालुक्यातील सायगावात पाहायला मिळत आहे.
शुभम वसंत निघुट व अक्षया धनाजी बारे यांच्या शुभविवाहानिमित्त सायगाव ग्रामस्थांसाठी रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण करण्यात येत असून हा उपक्रम ग्रामस्थांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरत आहे.
ग्रामीण भागात अपघात, प्रसूती किंवा आकस्मिक आजारपणाच्या वेळी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेकदा जीव धोक्यात येतो. हीच गरज ओळखून “एक जीव वाचला… तरच सेवेचे सार्थक!” या उदात्त भावनेतून ही सेवा सुरू केली जात आहे. त्यामुळे सायगाव व परिसरातील ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमात बचत गटातील महिलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र तसेच हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जपणूक यांचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.
मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता इंदुबाई लॉन्स, सायगाव येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. शेफालीताई भुजबळ उपस्थित राहणार असून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण होणार आहे.
कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन झी टॉकीज फेम मिमिक्री स्टार संदीप जाधव करणार आहेत.
ग्रामपंचायत सदस्य सौ. योगिता वसंत निघुट तसेच समस्त निघुट पाटील व बारे पाटील परिवार यांच्या पुढाकारातून हा समाजहिताचा उपक्रम साकार होत आहे.



