चांदवड येथे पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
Nandgaon news

चांदवड येथे पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि १२ जानेवारी २०२६
चांदवड तालुक्यातील दरेगाव शिवारात गुरुवारी (८ जानेवारी २०२६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात म्हसू नामदेव जेजुरे (वय ५१, रा. डोणगाव, ता. चांदवड) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा गणेश म्हसू जेजुरे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, गणेश जेजुरे आणि त्यांचे वडील बजाज बॉक्सर मोटारसायकल (एमएच १५ यू ११६३) वरून जात असताना, कोकणखेडे बाजूकडून येणाऱ्या पिकअप गाडीने दरेगाव शिवारातील बारीमधील वळणावर उजव्या बाजूने कट मारला. पिकअप चालकाने वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने दुचाकी घसरून अपघात झाला.
या अपघातात म्हसू जेजुरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर ९ जानेवारी २०२६ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेत फिर्यादी गणेश जेजुरे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघात करणारी गाडी ‘पिकअप’ प्रकारची असून, तिच्या बोनेटवर “अहिल्या शासन” आणि डाव्या बाजूस “गायत्री दूध सप्लायर” असे लिहिलेले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर पिकअपचा चालक रामकृष्ण दादाजी गाढे (रा. कुंभार्डे, ता. देवळा) असल्याचे निष्पन्न झाले आहे. फिर्यादीने घटनास्थळी विचारणा केली असता चालकाने उद्धट उत्तरे देऊन घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, निष्काळजी वाहनचालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. चांदवड पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटतेमुळे डोंणगांव परिसरात शोककळा पसरली .



