चोरट्यांच्या तावडीतून मंदिर ही सुटेना ; श्री.महालक्ष्मी माता मंदिरात ५८ हजार रुपयांची चोरी ; चांदीच्या पादुका, समई व रोख रक्कम लंपास

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील शिवापुर (शेळकेवाडी) येथील श्री.महालक्ष्मी माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चांदीच्या पादुका, पितळी समई तसेच दानपेटीतिल रक्कम असा एकूण सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
फिर्यादी दिनकर पंढरीनाथ जगताप यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे गावातील महिला राही भाऊसाहेब पवार या दर्शनासाठी गेल्या असता श्री.महालक्ष्मी माता मंदिरात दरवाजाचे कडी कोंयडा तुटलेले दिसले. त्यांनी तात्काळ मला कळवले. मी सोबत निलेश राजाराम जगताप, संदीप प्रकाश मोगल, दत्तु सुभाष जगताप, हेमंत बबन जगताप असे मंदिराकडे गेलो असता दानपेटीचे कडी कोयंडा तुटलेला दिसला तसेच श्री.महालक्ष्मी माता मंदिरात चिटकवलेल्या चांदीच्या पादुका दिसल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला मंदिरात चोरी झाल्याची खात्री झाल्याने पो.पा.मधुकर डोमाडे व गणेश जगताप यांना माहीती दिली. आम्ही चोरी गेलेल्या मालाचे अवलोकन केले असता, प्रथमदर्शनी ४५ हजार रु.च्या अंदाजे अर्धा किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, ८ हजार रु.ची पितळी समई, ५ हजार रोख रुपये असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने कोणीतरी अज्ञात चोरट्यांने मंदीराचा दरवाजा तोडुन चोरी करुन नेला म्हणुन माझी अज्ञात चोरट्याविरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. त्यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.कॉ.नवनाथ नाईकवाडे अधिक तपास करीत आहेत.



