निफाड तालुक्यातील धारणगाव वीर येथील मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू.

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.८ नोव्हें २०२५ :- धारणगाव वीर येथे दि.१८ ऑक्टो.२०२५ रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झालेले सुकदेव लक्ष्मण सानप, वय ८२ यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
यापूर्वी सिताबाई नवनाथ सानप रा.धारणगाव वीर यांनी दिलेल्या फिर्यादीत, दि.१७ ऑक्टो रोजी फिर्यादी व फिर्यादीचे पती दिवाळीचा किराणा सामान घेऊन धारणगाव वरून घराकडे जात असताना संशयीत कृष्णा गंभीरे याने त्यांच्या मोटारसायकलला लाथ मारली. त्यामुळे फिर्यादी व पती दोघे ही खाली पडले असता संशयीत तेथुन पळुन गेला. त्यानंतर दि.१८ ऑक्टो रोजी संशयीत कृष्णा हा फिर्यादी सानप यांच्या घरासमोरुन जात असतांना पाठीमागून त्याचा कामगार जेसीबी
घेऊन जात असताना फिर्यादीचे सासरे सुकदेव लक्ष्मण सानप यांनी कृष्णा यांस आदल्या दिवशीच्या भांडणाचा जाब विचारला असता, कृष्णा याने जेसीबीत ठेवलेल्या लोखंडी रॉडने सुकदेव सानप यांच्या डोक्यावर, हातावर, पायावर मारहाण केली. त्यामुळे सुकदेव सानप हे खाली पडले व त्यांच्या डोक्यातुन रक्त येऊ लागले.
फिर्यादीचे पती सोडवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की केली व त्याने फिर्यादीच्या कुटुंबाला मारहाण करण्यासाठी साहेबराव चिंधु गंभीरे, राजेंद्र चिंधु गंभीरे, निलेश राजेंद्र गंभीरे, बाजीराव चिंधु गंभीरे ,काशिनाथ चिंधु गंभीरे यांना बोलावून फिर्यादीचे सासरे व पती यांना पुन्हा मारहाण केली. फिर्यादी स्वतः भांडण सोडवण्यासाठी गेले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली व तुम्ही आमच्या जर नादी लागले तर संपवून टाकू असा दम दिला अशी फिर्याद दिली.
त्यांचे फिर्यादीवरून संशयितांच्या विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात भा.न्या.सं च्या कलम ११८(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९०(१), १९१(२), १९१(३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ३७(१), ३७(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीतांना पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. आरोपींची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. यातील जखमी सुखदेव लक्ष्मण सानप हे दि.१८ ऑक्टो.पासून वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक येथे उपचार घेत होते. त्यांचे प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांचा दि.८ नोव्हें रोजी रात्री २ वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सदर आरोपींच्या विरोधात वाढीव १०३ हे कलम लावण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास स.पो.नि. भास्करराव शिंदे हे करीत आहेत.



