अल्पवयीन मुलीच्या अपहरण करत विवाह लावल्याप्रकरणी तिघा महिलांना पाच वर्षांची सक्तमजुरी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील ओझर येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवाहासाठी विक्रीच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी तिन महिलांना दोषी ठरवत पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा निफाडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कोर्हाळे यांनी सुनावली आहे.
या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईने दि .२३ जुलै २०२५ रोजी ओझर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीत पिडीत मुलीस फुस लावून पळवून नेल्याची माहिती दिली होती. तपासा दरम्यान पिडीत मुलीस प्रियंका देविदास पानपाटील, रत्ना विक्रम कोळी व सुरेखा जागो भिल्ल यांनी पळवून नेले असल्याचे उघड झाले. तसेच गोविंद मनसारे व नानुराम मनसारे यांनी मुलीची विक्री करून तिचा विवाह रवि मनसारे याच्यासोबत लावल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी आरोपपत्र सादर केले. न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी म्हणून पो.हवा. रत्नाकर बागुल यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील आर.एल.कापसे यांनी फिर्यादी, पिडीत व तपास अधिकारी अशोक रहाटे यांच्यासह सात साक्षीदारांची साक्ष नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला.
न्यायालयासमोर सादर झालेल्या पुराव्यांनुसार पिडीत मुलीचे अपहरण संगनमताने केल्याचे दोषी महिलांवर सिद्ध झाले. त्यानुसार न्यायालयाने तिन्ही महिलांना भादंवि कलम ३६३ व ३४ अन्वये प्रत्येकी पाच वर्षांची सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. उर्वरित तीन संशयितांना निर्दोष मुक्त करण्यात आले.



