बालिकेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांची सश्रम कैद व तीस हजार रुपये दंड ; सध्या लासलगाव पोलिस ठाण्यात नेमणूक असलेले सहा.पो. निरीक्षक भास्करराव शिंदे यांची तत्पर तपास कामगिरी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ : येवला तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मा.अपर जिल्हा व सत्र न्यायालय, येवला यांनी दिलेल्या या निकालात पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे दोषारोप सिद्ध झाला.
आरोपी योगेश पंढरीनाथ घुगे (रा.राजापूर, ता.येवला) याच्यावर दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी येवला पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४५/२०२३ भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३६६, ३७६, ३५४ सह ‘पॉक्सो’ कायद्यानुसार कलम ४ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व सध्या नेमणूक लासलगाव पोलिस ठाणे भास्कर जनार्दन शिंदे यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी हेड कॉन्स्टेबल पवार (क्रमांक ७७५) यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
सरकारी पक्षाच्या वतीने वकील सुनील सरोदे आणि वकील गणेश बोरसे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, पुरावे आणि वैद्यकीय अहवालांचा बारकाईने अभ्यास करून आरोपी दोषी ठरविला. मा. न्यायाधीश एम.वाय.लोकवानी यांनी आरोपी योगेश घुगे यास २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त सश्रम कैद भोगावी लागणार आहे.
निर्णय जाहीर होताच आरोपीने न्यायालयात हंबरडा फोडला. या निकालामुळे येवला पोलीस ठाणे आणि तपास पथकाच्या कार्यप्रणालीचे कौतुक होत आहे. बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यात पोलिसांची तत्परता आणि न्यायालयाचा कठोर निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.



