नाशिक ग्रामीण

खेडलेझुंगे येथे दुचाकी चारचाकी भीषण अपघातात पती – पत्नीचा मृत्यू ; भाच्याकडुन झालेल्या अपघातामध्ये मामा – मामी ठार

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१ नोव्हेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे गावाजवळील नदीवरील पुलावर आज शनि. दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती – पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किसन एकनाथ दराडे (वय ३८) आणि त्यांची पत्नी बेबी दराडे, दोघेही खंबाळे (ता. सिन्नर) येथील रहिवासी होते. हे दोघे आपल्या हिरो स्प्लेंडर (एम.एच.१५ बी. वाय ५७२५
या दुचाकीवरून खंबाळ्याकडे जात होते.

दरम्यान, खेडलेझुंगे नदीवरील पुलावर मागून आलेल्या इको (एम.एच.१५ जे.एस.१९५४ या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, किसन दराडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी बेबी दराडे गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक समाजसेवकांनी तत्काळ मदत करून निफाड येथे उपचारासाठी घेऊन जात असतांना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात सहभागी इको वाहन भाऊसाहेब साखहरी साबळे (वय ३३) चालवत होते. विशेष म्हणजे दराडे व साबळे हे मामा–भाचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील, सायखेडा पोलीस ठाण्याचे स.पो.नि विकास ढोकरे तसेच लासलगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास उपविभागीय अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ढोकरे करत आहेत.

दरम्यान, अपघातातील चारचाकी चालक भाऊसाहेब साबळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी दराडे दाम्पत्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!