या मार्गावर वाघाचा हल्ल्याचा प्रयत्न; कारधारकाने वाचवले पती-पत्नीचे प्राण
Nandgaon News
- या मार्गावर वाघाचा हल्ल्याचा प्रयत्न; कारधारकाने वाचवले पती-पत्नीचे प्राण
बोदवड, जि. जळगाव
बोदवड ते जामनेर या मार्गावरील बिळातली देवीच्या जंगल परिसरात एक थरारक प्रकार घडला. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीच्या जोडप्यावर एका पट्टयावाला वाघाने अचानक झडप घालत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनधारकाने प्रसंगावधान राखून तत्काळ गाडी थांबवली आणि त्या जोडप्याला आत घेत त्यांच्या जीवावर आलेला धोका टाळला.
घटनेदरम्यान कारधारकाने आपल्या मोबाइलद्वारे संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, त्यात वाघ स्पष्टपणे रस्त्यावर येऊन हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. काही क्षणांनंतर तो परत जंगलाच्या दिशेने पळून गेला.
स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी या घटनेनंतर वनविभागाला माहिती दिली असून, संबंधित परिसरात वनअधिकाऱ्यांनी गस्त वाढविली आहे.
या घटनेमुळे बोदवड-जामनेर मार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सायंकाळनंतर या मार्गावरून एकटे प्रवास टाळावा, अशी विनंती वनविभागाने केली आहे.
वरील वृत्तांतातील घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे .



