सिंहस्थ कुंभमेळाचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा. कुंभमेळा मंत्री समिती बैठकीत मंथन
सिंहस्थ कुंभमेळाचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा. कुंभमेळा मंत्री समिती बैठकीत मंथन

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
नाशिक /दि.29 ऑक्टोबर /2025: नाशिक सिंहस्थ कुंभमेळाचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा यासाठी मंथन आज रोजी कुंभमेळा मंत्री समिती बैठकी प्रसंगी करण्यात आले.
कुंभमेळा मंत्री तथा समिती प्रमुख नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण श्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयामध्ये कुंभमेळा मंत्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सदर बैठकीस अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री, दादाजी भुसे, उद्योग मंत्री, उदय सामंत, पर्यावरण व पशूसंवर्धन, मंत्री, पंकजाताई मुंडे, पणन व राजशिष्टाचार मंत्री, जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री, शिवेंद्रसिंह राजे भोसले, क्रीडा युवक कल्याण मंत्री, माणिकराव कोकाटे, परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त तथा सदस्य सचिव नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण शेखर सिंग, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे जलेज शर्मा, पोलीस विशेष महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
नाशिकचा कुंभमेळा पावसाळ्यामध्ये होत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता असून प्रशासनाने सर्व शक्यता ची पडताळणी करून कार्यवाही करावी असे निर्देश कुंभमेळा मंत्री, गिरीश महाजन यांनी यावेळी दिलेत.
12 वर्षे पूर्वीच्या कुंभमेळा चा अनुभव लक्षात घेता यावेळी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने त्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, छगन भुजबळ यांनी रामकुंडावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करून ज्या सुविधा कुंभमेळ्याच्या निमित्ताने उपलब्ध होत आहेत त्या कायमस्वरूपी नाशिकच्या जनतेला उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून नियोजन होणे आवश्यक असल्याचे यावेळी सूचित केले.
तसेच गोदावरी नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर देखील तातडीने कार्यवाही करून नदीपासून ते वेगळे करणे आवश्यक असल्याचे व त्यावर प्राधान्याने कार्यवाही करावी असे त्यांनी यावेळी निर्देशित केले.
शालेय शिक्षण मंत्री, दादाजी भुसे यांनी नाशिक येथे नव्याने रुग्णालय उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ज्या सुविधा उभारण्यात येत आहेत त्याचा वापर भविष्यात झाला पाहिजे यासाठी प्रशासनाने नियोजन करावे असे सुचित केले तसेच नाशिक जिल्ह्यातील असलेल्या तीर्थक्षेत्रांचा म्हणजेच सप्तशृंगी गड , सर्व तिर्थटाकेद , कपिलधारा तीर्थ कावनई, तपोवन,शुल्क तीर्थ राम मंदिर इगतपुरी, यासह इतर पर्यटन क्षेत्राचा देखील विकास या निमित्ताने व्हावा असे सूचित केले.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री, माणिकराव कोकाटे यांनी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलाबाबत प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे व हे काम सुरू करताना जनतेला कोणती अडचण होणार नाही जनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे यावेळी निर्देशित केले.
उद्योग मंत्री, उदय सामंत यांनी देखील नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलन प्रसंगी देखील नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ब्रँडिंग करण्याचे सुचित केले तसेच नाशिक औद्योगिक क्षेत्र परिसरात उद्योग प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करून याची मागणी केली.
पर्यावरण व पशूसंवर्धन मंत्री, पंकजा मुंडे यांनी देखील नियोजन करताना तीन टप्प्यांवर नियोजन करावे असे यावेळी सुचीत केले. तर परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या वतीने 200 नवीन बसेस महामंडळास उपलब्ध व्हाव्यात, व सदर बसेस कुंभ नंतर राज्यात उपयोगी पडतील असे यावेळी सांगितले. पणन व राजशिष्टाचार मंत्री, जयकुमार रावल यांनी नाशिक विमानतळ परिसरात देश परदेशातून येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष सुविधा तसेच इतर ठिकाणी देखील अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा निश्चिती करण्याचे यावेळी सुचित केले.
कुंभमेळा प्राधिकरणाचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तसेच इतर विभागांच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. आरोग्य, पर्यटन, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभाग, जलसंपदा विभाग, विमानतळ प्राधिकरण, रेल्वे ऑथॉरिटी, महानगरपालिका, नाशिक महानगर विकास प्राधिकरण, या विभागांसह इतर विभागांचा यावेळी सविस्तर आढावा व कामकाजाची सद्यस्थिती मंत्री समितीतील सदस्यांनी जाणून घेतली.
उपस्थित सर्व मंत्री समितीतील सदस्यांनी प्रशासनामार्फत तसेच शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत व त्यातून करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत समाधान व्यक्त करून नाशिकचा कुंभमेळा हा उत्कृष्ट व प्रभावीपणे करून देशात परदेशात लौकिक व्हावा अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
—————————————–



