भाजीपाला लिलावात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वेगवान मराठी : मारुती जगधने
” दिः 27 ऑक्टोंबर 2025 “
नांदगाव (जि. नाशिक): नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला लिलाव प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हिताचे नियम लागू करून पारदर्शकता आणावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार किसान सेल) तर्फे तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण व शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिव अमोल खैरनार यांना प्रत्येक्ष भेटून मागणी केली या मागण्यांची अंमलबजावणी एका महिन्यात न झाल्यास भाजीपाला लिलाव बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या
लिलाव वजनानुसार घ्यावा,सध्या कॅरेट पद्धतीने होणारा लिलाव अनेकदा अनियमित ठरतो. प्रत्येक शेतकऱ्याला योग्य दर मिळावा यासाठी लिलाव “किलो प्रमाणे” घेण्यात यावा. वजन काट्यांवर बाजार समितीचे नियंत्रण असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांकडून अडत वसुली बंद करावी:
शेतकऱ्यांच्या मालावर कोणतीही दलाली अथवा कमिशन आकारली जाऊ नये. व्यापारी किंवा खरेदीदारांनी त्यांच्या व्यवहारातील खर्च स्वतः करावा, अशी मागणी कायदेशीर आधारासह (कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा १९६३, नियम ३८) करण्यात आली.
शेतकऱ्यांचे कॅरेट परत मिळावेत
लिलावानंतर शेतकऱ्यांना स्वतःचे कॅरेट परत मिळावेत, कारण अनेकदा कॅरेट हरवतात वा उशिरा मिळतात, ज्यामुळे पुढच्या दिवसाचे काम अडते
व्यापाऱ्यांनी स्वतःचे कॅरेट वापरावेत:
व्यापाऱ्यांनी, खरेदीदारांनी किंवा केवटांनी त्यांच्या स्वतःच्या कॅरेटचा वापर करावा. शेतकऱ्यांना कॅरेट शोधण्यात वेळ जातो आणि कामात विलंब होतो, हे टाळण्यासाठी हा उपाय आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
लिलाव प्रक्रिया समितीच्या नियंत्रणाखाली असावी:
बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीतच लिलाव पार पडावेत, जेणेकरून साटेलोटे किंवा गैरप्रकारांना आळा बसेल.
निलेश चव्हाण यांनी सांगितले की, “सध्याच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पारदर्शक लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल आणि दरनिश्चितीतील अन्याय कमी होईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य मूल्य मिळावे, त्यांना दलालीचा भार पडू नये आणि त्यांचा वेळ व श्रम वाया जाऊ नयेत, यासाठीच या मागण्या करण्यात आल्या आहेत.”
बाजार समिती सचिवांना या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
जर या कालावधीत योग्य सुधारणा झाल्या नाहीत, तर भाजीपाला लिलाव बंद करण्याचा आंदोलनात्मक निर्णय घेण्यात येईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे .
भाजीपाला लिलाव संदर्भात बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार हे शेतकऱ्यां शी बोलतांना किंवा शेतकऱ्यांशी संवाद साधतांना शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात सकारात्मक असल्याचे दिसून आले .



