या शहरात दिवाळीतच अंधार — महावितरणचा सावळा गोंधळ ?
दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणात मनमाड शहर मात्र अंधारात बुडाले आहे! 26 ऑक्टोबरपासून महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे शहरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. ऐन सणासुदीच्या काळात, कोणतीही पूर्वसूचना न देता बाजारपेठेत तब्बल १२ ते १३ तास वीज गायब — व्यापारी व नागरिक दोघेही संतप्त!
“दिवाळीत अंधार, आणि जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल मनमाडकर विचारत आहेत.
महावितरणच्या अकार्यक्षमतेमुळे दिवाळीचा उजेड विझला आहे. मनमाडच्या बाजारपेठा चमकायच्या, पण आता त्या अंधारात हरवल्या आहेत. प्रकाशाच्या सणाला अंधाराचा ग्रहण लावणाऱ्या या प्रशासनाने आता तरी जागं व्हावं — हीच जनतेची अपेक्षा
दिवाळीच्या काळात बाजारपेठा सजल्या असताना, महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता बाजारपेठेत १२ ते १३ तास वीज गायब असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची गर्दी वाढली असताना अंधारामुळे व्यापारीवर्ग हतबल झाला आहे.
या संदर्भात मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पारीक यांनी महावितरण कंपनीवर तीव्र शब्दांत टीका करत इशारा दिला आहे की, “महावितरणने तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा व्यापारी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. या आंदोलनातून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण अधिकाऱ्यांची राहील.”
नागरिक आणि व्यापारी वर्गाने महावितरणच्या या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सणाचा आनंद हरवू नये म्हणून नागरिक महावितरणकडून तत्काळ उपाययोजना अपेक्षित आहेत.
दरम्यान शहरातील काही सुज्ञ नागरिक महावितरण कंपनीच्या कार्यालयात गेले असता त्या कार्यालयातील फोन बंद असल्याने संताप व्यक्त केला जातो फोनवरून तक्रार करताना फोनच बंद मग तक्रार कशी करावी असा प्रश्न उद्भवतो .
मनमाड शहरातील मनमाड पुणे हायवे वरती असणारे सर्व विजेचे पोल यावरती सातत्याने सुरू असणारा वीज पुरवठा हा मनमाड शहरासाठी जोडलेला आहे त्यामुळे या मार्गावरील सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील विजेच्या खांबाला एखाद्या वाहनाचा धक्का लागला की मनमाड शहरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित होतो आणि हे वारंवार घडत आहे यावर तात्काळ उपाय योजनांची मागणी होत आहे विज पुरवठा सुरळीत होतो पण त्याची शाश्वती मात्र नाही .
मनमाडमध्ये पुन्हा एकदा “प्रकाशाचा सण अंधारात” गेल्याने सर्वत्र संतापाची लाट



