कांद्याचे भाव 5 हजार होणार की 700 वर येणार पहा
कांद्याचे भाव 5 हजार होणार की 700 वर येणार पहा

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक :27ऑगस्ट :नाशिक जिल्ह्यातील शेतशिवारात यंदाच्या खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडीला जोरदार सुरुवात झाली आहे. पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी तातडीने लागवडीची कामे हाती घेतली असून, यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात चांगल्या उत्पादनाची व दराची आशा व्यक्त होत आहे.
खरीपातील पोळ कांदा हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे पीक मानले जाते. यावर्षी उन्हाळी कांदा चाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सड झाल्यामुळे खरीप कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महागडे उळे घेऊन लागवड केली. सुरुवातीला रोपे नासण्याची अडचण निर्माण झाली होती; मात्र नियमित पाऊस व पोषक हवामानामुळे आता कांदा रोपे पुन्हा उभारी घेऊ लागली आहेत.
अनुकूल हवामान व पुरेशा पाणीपुरवठ्यामुळे यंदा लागवडीची कामे जोमाने सुरू आहेत. गेल्या वर्षी कमी पाऊस आणि पाण्याची टंचाई यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करणे शक्य झाले नव्हते, किंवा फारच कमी क्षेत्रात करावी लागली होती. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी असून शेतकऱ्यांनी कांद्याकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहिले आहे.
यावर्षी शेतकरी पारंपरिक घरगुती उळ्यांबरोबरच सुधारित बियाण्यांचा वापर करण्यासही प्राधान्य देत आहेत. अनेक ठिकाणी नवीन संकरित जातींची बियाणे वापरली जात आहेत. ही बियाणे रोगप्रतिकारक असून कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारी असल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च दोन्ही कमी होत आहेत. त्यामुळे कांद्याच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
राज्यात नाशिक जिल्हा हा पोळ कांद्याचे केंद्र मानला जातो. त्यात येवला, नांदगाव, चांदवड आणि सिन्नर हे तालुके पोळ कांद्याच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. या भागातील अनुकूल हवामान, सुपीक जमीन आणि मुबलक पाणीपुरवठा यामुळे पोळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. येथून होणारा कांद्याचा पुरवठा केवळ राज्यातच नव्हे, तर देशभर केला जातो.
त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कांद्याचे पीक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कांद्याचे भाव वाढणार की कमी होणार
शेतीमालाचे बाजारभाव हा मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून आहे, मात्र गेल्या वर्षभरापासून कांद्याला चांगला भाव मिळवता आला नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जाणार आहे. कारण खरीप हंगामामध्ये सर्वात जास्त विक्रमी उत्पादन मका पिकाचे निघणार आहे. मका पिकाची कापणी झाल्यानंतर सर्व शेतकरी मक्याच्या शेतामध्ये कांदा लागवड करणार आहे. जर यदा कदाचित पावसा पाण्यामुळे कांदा पीक खराब झालं तर नाशिक जिल्ह्याला कांदा पिकाला फटका बसणार आहे. परिणामी भाव वाढणार आहे, मात्र जर बंपर कांदा उत्पादन निघालं तर कांद्याचे बाजार भाव सातशे रुपये वरती येण्यास वेळ लागणार नाही. असं जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.



