नाशिक जिल्ह्यात बसला मोठा अपघात;चार प्रवासी गंभीर जखमी
मुरबाड आगाराच्या बसचा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बसला अपघात; ४ प्रवाशी गंभीर
मनोज वैद्य/ देवळा
दि.१३ ऑगस्ट २०२५
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या एका भरधाव बस वरील चालकाचा उमराणे जवळ बस वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. त्यात ४ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यालगतच्या एका झाडाला जोरदार धडक दिली आणि ती पलटी झाली. या अपघातात ४ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, १२ ते १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते.

मुरबाड येथून नावी, जळगाव येथे निघालेली बस (एमएच १४ एएच ०४८३) मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना, उमराण्याजवळ असलेल्या सोनाई काट्याजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस १०० ते १५० मीटरपुढे जाऊन रस्त्याच्या खाली उतरली. त्यानंतर ती एका झाडाला धडकली आणि पलटी झाली. यावेळी झाडाची फांदी अडकल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकरी, सोमा कंपनीची पेट्रोलिंग टीम आणि उमराणे येथील सामाजिक कार्यकर्ते तातडीने मदतीसाठी धावले. यानंतर त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर उमराणे ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेद्वारे गंभीर जखमींना तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.



