वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.७ ऑगस्ट २०२५ :- पोलिस भरती करून देण्याचे आमिष दाखवत आणि बनावट पोलीस गणवेश व नेमप्लेट देत एक तरुणीची साडेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिषेक प्रभाकर पाटील (वय २४, मूळ रा. एकुलती, ता. जामनेर, जि. जळगाव, सध्या रा. द्वारका, नाशिक) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी बेघरवस्ती, औरंगपूर (ता. निफाड) येथील १९ वर्षीय कु. स्वाती राजेंद्र चाबुकस्वार हिने सायखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मार्च २०२२ पासून ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आरोपी अभिषेक पाटील याने तिच्या आई-वडिलांचा विश्वास संपादन करून विविध बहाण्यांनी फसवणूक केली. “तुमची मुलगी कुणा मुलासोबत पळून जाणार आहे, म्हणून तीला औरंगाबाद मधील कॉलेजमध्ये प्रवेश देऊ नका. तिचा दाखला मला द्या, मी तिला बुलढाणा येथे माझ्या ओळखीच्या कॉलेजमध्ये प्रवेश देतो,” असे सांगत फिर्यादीच्या आईकडून शाळा सोडल्याचा दाखला घेतला. याचबरोबर “तुमच्या मुलीला बारावी उत्तीर्ण करून तिला आमदार व मंत्र्यांच्या ओळखीतून पोलीस भरतीत लावतो,” असे सांगून आरोपीने आठ लाखांची मागणी केली. त्यातील साडेचार लाख रुपये त्याने विश्वासात घेऊन स्वीकारले. यानंतर संबंधित तरुणीला पोलीस झाल्याचे खोटे सांगून तिला बनावट पोलीस गणवेश व नेमप्लेट तयार करून दिली. इतकेच नव्हे तर तिचा सत्कार देखील काही मान्यवरांकडून करवून घेतला. या प्रकरणात आरोपीने बनावट पोलीस ओळखपत्रे तयार करून फिर्यादीला महावीर पोलीस अकॅडमी, दादर (मुंबई) येथे प्रशिक्षणासाठी दाखलही केले. इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या बहिणीच्या नावाने खोटे बॅनर लावून खोटी प्रसिद्धी दिली. या सर्व प्रकारातून फिर्यादी व तिच्या कुटुंबियांची फसवणूक करण्यात आली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३७/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३१६(२), ३१९(२), ३१८(४), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अभिषेक पाटील याला अटक केली असून पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत सौंदाणे पुढील तपास करत आहेत.