मळ्यात फक्त जनावरं च नाही तर माणसं पण राहतात –गावांमध्ये चोवीस तास लाईट मळ्यात मात्र अंधार…
मळ्यात माणसं राहत नाही का ? -- समाधान बागल

वेगवान मराठी (Nasik)/भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर.दि :26 जुन –प्रेस नोट
*शहरात व गावात २४ तास वीज, पण शेतात अंधारच का? – मळ्यात माणसं राहत नाहीत का? = समाधान बागल सामाजिक कार्यकर्ता
प्रतिनिधी(नाशिक )गाव आणि शहरांमध्ये २४ तास अखंड वीजपुरवठा होत असताना, शेतकरी व मळ्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही अंधारातच जीवन कंठावे लागत आहे. शेतात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी लाइट नसल्यानं अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. मळ्यांवर वस्ती असतानाही वीज नाही, याकडे शासनाचे व वीज वितरण कंपन्यांचे दुर्लक्ष होत आहे.
“मळ्यात माणसं राहत नाहीत का?” असा थेट सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. शेतमळे म्हणजे केवळ शेतीसाठीच नव्हे, तर अनेक कुटुंबांची वास्तव्याची जागा बनली आहे. रात्रीच्या वेळेस सुरक्षेच्या दृष्टीने लाइट अत्यावश्यक आहे. वन्य प्राण्यांचा धसका, चोरी, अपघात अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
वीज वितरण कंपन्या शेतकरी पंपसाठी वेळेवर लाइट देत नाहीत, त्यात मळ्यांमध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी अनेक तांत्रिक आणि प्रशासनिक अडचणींचा सामना करावा लागतो.
शासनाने एकीकडे “स्मार्ट गाव”, “स्मार्ट शेती” यांसारख्या घोषणा केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात शेतकरी अंधारातच राहतोय, हे विदारक वास्तव आहे.
स्थानिक नागरिकांची मागणी:
मळ्यांमध्ये वीजपुरवठा नियमित करावा
स्थायी रहिवास असलेल्या शेतवस्त्यांना घरगुती कनेक्शन द्यावे
वीजपुरवठा सोलरद्वारे किंवा ट्रान्सफॉर्मर वाढवून द्यावा
शेतकऱ्यांसाठी वीजदरात सवलत द्यावी
शासन व संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मळ्यांमध्ये माणसे राहतात, त्यांनाही जगायला उजेड लागतो. विकासाच्या गप्पा करताना, खऱ्या अर्थाने देश पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात मात्र अंधार का?



