मोठ्या बातम्या

भाजपाने मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करावे : हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस, अजित पवार व शिंदेंची मोदींकडे पत असेल तर विशेष पॅकेज आणून राज्याची आर्थिक घडी रुळावर आणावी...


दि. १५ एप्रिल २०२५

काँग्रेसचे आजपर्यंत ८९ अध्यक्ष झाले, त्यात सर्व जाती धर्माचे, महिला, पुरुष, आदिवासी, एससी, एसटी, हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन धर्माचे नेते होते. काँग्रेसने विकासाची कामे करताना त्याची फळे सर्व जाती धर्माला मिळावीत हेच पाहिले पण आता भाजपावाले त्यांना मुस्लीम समाजाची खुप काळजी असल्याचे दाखवत आहेत. मुस्लीम महिलांच्या हितासाठी तीन तलाक व गरिब मुस्लीमांसाठी वक्फ बोर्ड कायदा आणला हे भाजपा नेते सांगत आहेत. भाजपाचा हा मुस्लीम कळवळा पाहता पंतप्रधानपदी किंवा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुस्लीम व्यक्तीला संधी द्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

अकोला येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे. नरेंद्र मोदी हे सुद्धा ७५ वर्ष पुर्ण करत आहे, त्यांना निवृत्तीचे वेध लागले असतील, रा. स्व. संघातून कोणाच्या नावाचे पाकीट येणार, त्यापेक्षा तुम्हीच एखाद्या मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान किंवा भाजपाचा अध्यक्ष करा. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विश्रांती द्यावी व त्यांच्या जागी आदिवासी वा दलित समाजाच्या व्यक्तीला सरसंघचालक पदी बसवावे, असेही सपकाळ म्हणाले.

मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. सर्व सत्ता आपल्याच हाती हवी या हट्टापायी या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. राज्यातील सर्व सत्ता तीन लोकच चालवत असून लुटारुंची रचना निर्माण केली आहे. शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्याच्या आधीच त्याचे भाव पाडण्याचे काम मोदी सरकारने केले, दिडपड भाव दिले नाहीत पण शेतकऱ्यांचे कंबरडे मात्र मोडले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सरकारने अतिव़ृष्टीचे, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत, ठेकेदारांचे पैसे दिले नाहीत, लाकडी बहिणीला पैसे देत नाहीत, एसटी कर्माचाऱ्यांना पगार मिळत नाही. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या तिघांची नरेंद्र मोदींकडे पत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज आणून शेतकरी कर्जमाफी द्यावी व राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित करावी.

राज्यात अवैध व्यवसायाने कळस गाठला आहे, गांजा, अंमली पदार्थाचा काळा बाजार सुरु आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून राज्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत आहे, पण पोलीस काहीही कारवाई करत नाहीत. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!