जप्त मालमत्तेवर बोजे नोंदवण्याचे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी यांचे निर्देश

जप्त मालमत्तेवर बोजे नोंदवण्याचे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी यांचे निर्देश
सटाणा तालुक्यातील सभासदांकडे जिल्हा बँकेची 4338 थकबाकीदारांकडे 5961.96 कोटी थकबाकी
वेगवान नाशिक \अतुल सुर्यवंशी
सटाणा दि.५एप्रिल : सहकारी बँकेची गत आर्थिक वर्षअखेरीस अपेक्षित थकबाकी वसुली झालेली नाही. त्यामुळे बँकेने आता थकबाकीदारांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या सटाणा तालुक्याकडे बँकेने आपला मोर्चा वळविला असून, तालुक्यातील थकबाकीदार सभासदांची मालमत्ता जप्त करून त्यावर बँकेचे बोजे नोंदविण्यात येणार आहेत.
जिल्हा बँक व सहकार विभागाच्या वतीने सटाणा येथे शनिवार(दि. ५) जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके आदींसह विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे व सहा.विभागीय अधिकारी हेमंत भामरे व संस्था सचिव उपस्थित होते. थकबाकीदारांविरोधात बँकेने कडक पवित्रा घेतला आहे.
ज्या थकबाकीदारांचे वसुली दाखले मिळालेले नाहीत, त्यांचे दाखले संबंधित संस्था सचिवांनी तत्काळ १० तारखेच्या आत तयार करावेत. तसेच, ज्यांचे दाखले प्राप्त आहेत, अशा थकबाकीदार सभासदांची १०७ अन्वये स्थावर जंगम मालमत्ता जप्त करून त्यावर बँकेचे बोजे नोंदविण्यात यावेत, असे निर्देश मुलाणी यांनी दिले. बैठकीत मुलाणी यांनी तालुक्यातील १०० संस्थांच्या चार हजार तीनशे आडोतीस सभासदांकडे एकोणसाठ कोटी एकसष्ट लाख रुपये अधिक थकबाकी असल्याचे सांगितले. उपलब्ध १०१ दाखल्यांवर, तसेच उर्वरित १०१ प्रकरणांवर कार्यवाही येत्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी सचिवांना दिले. बैठकीस सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके, बँक निरीक्षक, संस्था सचिव आदी उपस्थित होते.
