मोठ्या बातम्या

नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार :- नाना पटोले

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोरटकर व सोलापुरकरांवर काय कारवाई केली? हे कोणाचे हस्तक आहेत ?


मुंबई, दि. २५ मार्च २५

नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण नागपूर पोलिसांनी ती हिरवी चादर ताब्यात का घेतली नाही. ती चादर ताब्यात घेतली असती तर ही घटना झालीच नसती. नागपूरला पेटवण्यात राज्य सरकारच जबाबदार होते हे ठामपणे सांगतो, असे ज्येष्ठ नेते नाना पटोले म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, नागपूरची दंगल ज्या भागात झाली त्या भागात मुख्यमंत्री फडणवीस यांचे बालपण गेले आहे. नागपूर शहर हे सर्वधर्म समभाव मानणारे आहे. आजपर्यंत असा प्रकार नागपूरमध्ये झाला नाही. या दंगलीवेळी पोलिसांची बघ्याची भूमिका राहिली. हिरवी चादर पेटवली गेली नसती तर दंगल झाली नसती ही वस्तुस्थिती आहे, यावर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे नाना पटोले म्हणाले.

कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कविता केल्याने उद्रेक झाला पण प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याचे काय? त्यांना अटक का केली नाही. छत्रपतींच्या नावाने या दोघांनी अपशब्द वापरले, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, त्याचे उत्तर द्यावे लागले. प्रशांत कोरटकर कोणाचा हस्तक आहे, त्याचे आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. जेलमध्ये असलेल्या महेश मोतेवारची जप्त केलेली आलिशान कार त्याच्याकडे कशी? राहुल सोलापूरकर कोणाचा माणूस आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? असे संतप्त प्रश्न विचारत पाशवी बहुमताच्या आधारावर जो कारभार चालला आहे तो महाराष्ट्र पहात आहे असे नाना पटोले म्हणाले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

परभणीतील सोमनाथ सुर्यंवंशी यांच्या मृत्यूचा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या त्रासाने झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात सांगितले. आता जो अहवाल आला आहे त्यात सुर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे त्यात म्हटले आहे. परभणीत पोलीस लाठीहल्ल्याचे आदेश मंत्रालयातून की पोलीस महासंचालक कार्यालयातून दिले त्याचे उत्तर सरकारने द्यावे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा.

राज्यात दर एक लाख लोकसंख्येमागे पोलिसांची संख्या १५५ इतकी आहे. राज्यात आज २१ हजार ८३१ पदे रिक्त आहेत ती किती दिवसात भरली जाणार आहेत. तसेच महिला पोलिसांची संख्याही कमी असून ती ३६ हजार ९०० असून हे प्रमाण केवळ १८.१० टक्के आहे. विलासराव देशमुख सरकार असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिला पोलीस भरती योजना सुरु केली होती असेही नाना पटोले म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!