मनोरंजन

समिधा बनली उल्का….

समिधा बनली उल्का...


मुंबई, दि. २२ मार्च २०२५

मनोरंजन विश्वातील अभ्यासू अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु. अनेक कलाकृतींमधून आपला अभिनयाचे नाणं खणखणीत वाजवणारी ही अभिनेत्री आता नव्या भूमिकेसह  रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूमिका’ या नवीन नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री समिधा गुरु उल्का या एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. जिगिषा अष्टविनायक निर्मित ‘भूमिका’ नाटकाचा शुभारंभ २८ मार्चला होणार आहे.  

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना समिधा सांगते की, “अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे. या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे कंगोरे साकारण्यात आव्हान असले तरी या व्यक्तिरेखेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळताहेत. उल्का ही गृहिणीअसली तरी तिला तिची स्वतंत्र मत आहेत. तिची स्वतःची अशी स्वतंत्र भूमिका आहे. उल्का आपली भूमिका आणि मतं आपल्या नवऱ्यासमोर व इतरांसमोर कशाप्रकारे मांडते? हे दाखवताना एका प्रवृत्तीचा आरसा या नाटकातून आपल्यामोर येईल. महिला प्रेक्षकांना तर ही उल्का म्हणजे आपणच आहोत की काय असं ही जाणवू शकतं इतकी ती व्यक्तिरेखा कालसुसंगत आहे.”

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते सचिन खेडेकर यांचे अमूल्य मार्गदर्शन इतर सहकलाकारांची उत्तम साथ या सगळ्यांमुळे मला वेगळ्या स्तरावर नेणारी भूमिका साकारणं शक्य झाल्याचं समिधा आवर्जून सांगते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेते सचिन खेडेकर या दोन मातब्बर कलावंतांसोबत काम करण्याचा आणि शिकण्याचा आनंद अभिनेत्री म्हणून मला समृद्ध करणारा आहे ‘भूमिका’ या नाटकाच्या निमित्ताने एक सशक्त कलाकृती नाट्यरसिकांना पहायला मिळेल हे निश्चित.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

‘भूमिका’ नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अशोक पत्की यांचे आहे. प्रकाशयोजना अमोघ फडके तर रंगभूषेची जबाबदारी उलेश खंदारे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा  प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. सूत्रधार प्रणित बोडके तर निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद  पद्माकर आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!