मोठ्या बातम्या

नागपूर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; तातडीने चौकशी करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपूर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; तातडीने चौकशी करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश


मुंबई, दि. १९ मार्च २०२५

नागपूर शहरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

जमावातील काही व्यक्तींनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी केली, ही अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, संबंधित आरोपींची तातडीने ओळख पटवून चौकशी करावी. यावेळी अन्य महिला नागरिकांना त्रास झाला का हे देखील तपासले जावे. अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात विशेष नियोजन करण्याची गरज असून, महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आखाव्यात आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण व साधनसामग्री पुरवावी, अशीही मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. समाजात पोलीस दलाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी पोलिसांनी त्यांना कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी प्रभावी प्रशिक्षण द्यावे आणि त्यासंबंधी ठोस धोरण तयार करून शासनास प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सूचित केले.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले गंभीर आणि असह्य असून, अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कडक पावले उचलण्यात येतील, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!