मोठ्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा हर्षवर्धन सपकाळांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारी: काँग्रेस

नागपूर दंगल प्रकरणी पोलीस इंजेलिजन्स फेल, पोलिसांवर हल्ले होत असतील तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा


मुंबई, दि. १८ मार्च २०२५

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कारभाराची व देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली पण त्याचा विपर्यास करून सपकाळ यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापली काय, डोळे फोडले, काय अशी चिखवणीखोर विधाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहेत, हे अत्यंत आक्षेपार्ह असून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर हल्ला व्हावा, अशी भडकाऊ विधाने शिंदे करत आहेत, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलाताना अतुल लोंढे म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यावेळी साधा निषेध तरी केला का? सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारे, भडकाऊ भाषा वापरणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची धमक एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते असे विधान करून छत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपा खासदाराचा निषेध करण्याची धमक शिंदे यांच्यात आहे का? असा सवाल लोंढे यांनी केला आहे.

नागपूर दंगलीवर बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नागपूर शहर हे शांतताप्रिय शहर आहे. हिंदू मुस्लीम दोघेही आजपर्यंत शांततेने रहात आहेत. राम नवमीला दोन्ही समाजाचे लोक उत्साहाने सहभागी होतात. तर ताजुद्दीनबाबाच्या उरुसामध्येही हिंदू मुस्लीम एकोप्याने सहभागी होतात, अशा शहरात धार्मिक दंगल होतेच कशी, सरकारला याची काहीच कल्पना नव्हती का, हे सरकारचे अपयश आहे. पोलिस इंटेलिजन्स काय करत होते आणि पोलिसांवरच हल्ले होत असतील तर गृहमंत्री पदावर फडणीस रहातात कसे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

मध्य नागपूरमध्ये ही घटना झाली असून याच भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे घर आहे. स्थानिक भाजपा आमदार प्रविण दटके पोलिसांना दोष देत असतील तर त्याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे पण दंगलीचा फायदा कोणाला होतो हे सर्वांना माहित आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिला अत्याचारांच्या घटना सातत्याने होत आहेत, शेतमालाला भाव नाही, तरुणांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी व महागाई वाढली आहे या मुळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न आहे असेही लोंढे म्हणाले. नागपुरकारांनी अफवांना बळी न पडता शांतता राखावी असे आवाहनही अतुल लोंढे यांनी केले आहे. विधिमंडळात पत्रकारांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी निषेध केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!