शेती

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर!, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत


मुंबई, १४ मार्च २०२५

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.

‘गेट वेल SOON!’, ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’, ‘संज्या छाया’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘चारचौघी’, ‘आज्जी बाई जोरात’ आदी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचे शिवधनुष्य उचलले आहे. आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक ‘भूमिका’ येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते… असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. अभिनेते सचिन खेडेकर यांनी आजवर दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका, नाटक या तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवला असून, सोबत हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.

आता आगामी ‘भूमिका’ या नाटकात ते कोणत्या रूपात रसिकांच्या भेटीला येतात याची उत्सुकता आहे. या नाटकातील सचिन खेडेकर यांच्या व्यक्तिरेखेबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. त्याचप्रमाणे नाटकातील इतर कलाकार आणि तंत्रज्ञ कोण असणार ? याची माहितीसुद्धा लवकरच उलगडली जाणार आहे. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!