समतेचा व स्त्री-पुरुष समानतेचा विचार आरएसएसला मान्य नाही, आजपर्यंत संघप्रमुख महिला का झाली नाही? – हर्षवर्धन सपकाळ.
मस्साजोग ते नेकनूर पहिल्या दिवशी २३ किमीची पदयात्रा, आजचा मुक्काम नेकनूर, उद्या पदयात्रा बीडकडे मार्गक्रमण करणार

मुंबई, ८ मार्च २०२५
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मातृशक्तीला अभिवादन करण्याचा दिवस असल्याने त्याचे औचित्य साधत ही सद्भावना पदयात्रा ही महिलादिनी सुरु केली. समतेचा व स्त्री पुरुष समानता हा विचार संघाला मान्य नाही. आजपर्यंत संघ प्रमुख महिला झालेली नाही, महिलांना एक वस्तू माननारी ही प्रवृत्ती आहे. राज्यात आज याच विचाराच्या पिल्लावळींनी आका, खोक्या हा खेळ मांडला आहे, त्याविरोधी आपण रस्त्यावर उतरलो आहोत, आपण संविधानाचा विचार पुढे घेऊन जाऊ, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
मस्साजोग येथून सकाळी सुरु झालेली सद्भावना पदयात्रा २३ किमीचा प्रवास करून नेकनूर येथे पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्त्रीभृणहत्या करण्यात येते हे चिंताजनक आहे. स्त्री पुरुष प्रमाणात बीड जिल्हा मागे आहे. आजच्या महिला दिनी स्त्री पुरुष समानतेचा संदेश घेऊन पुढे जावे लागणार आहे. मनुवादी विचार सरणीमुळे स्त्री भृण हत्यांचे प्रकार वाढले आहेत. मनुवादी विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम केले, त्यांची गाथा पाण्यात बिडवली. संत ज्ञानेश्वरांनी गीता सोप्या भाषेत लिहिली, त्यांना त्रास दिला. बहुजन समाजाच्या प्रगतीत या विचाराने विरोध केला. सावित्रिबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या त्याला विरोध करत फुले दांम्पत्यांना शेणाचे गोळे व दगड मारणारा विचार हाच होता.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकडोजी महाराज यांचा विचार हा आयडिया ऑफ इंडिया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपाच्या राज्यात मोकाट आहेत, त्यांना सरकार संरक्षण देते, पुरस्कार देऊन गौरव करत आहे. समाजासमाजात भांडणे लावणे हा भाजपाचा विचार आहे. पण आपल्याला पुरोगामी विचाराने पुढे जावे लागणार आहे. समाजातील विषमता दुर करण्यासाठी सद्भावना यात्रा काढण्यात आली आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले की, सरकारविरोधात बोलले की ईडी, सीबीआय, आयकर मागे लावले जातात, मतदार याद्या बदतात, यामुळे आता घराघरात पोहचावे लागेल. महाराष्ट्र काँग्रेसला आज बुद्ध व गांधींच्या मार्गाने चालणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांचे नेतृत्व लाभले आहे. तर देशाला राहुल गांधी यांच्यारुपाने एक दमदार नेतृत्व उभे लाभले राहिले आहे. देशातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे या परिस्थितीत आपण देशासाठी लढून मरायचे की घरात बसून सडून मरायचे, हे ठरवा असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले.
यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अर्थतज्ञ देसरडा, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रविंद्र दळवी, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, भगवानगडाचे विश्वस्त आणि जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
