‘गाव समृद्ध तर देश समृद्ध…’, ‘गाव बोलावतो’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
'गाव बोलावतो' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मुंबई, ७ मार्च २०२५
आपलं गाव समृद्ध करण्यासाठी एका बापाने आपल्या शहरातील मुलाला हाक द्यावी आणि मुलाने कोणताही विचार न करता आपल्या गावासाठी झोकून द्यावे आणि वडिलांचे समृद्ध गावाचे स्वप्न साकार करावे… हीच गोष्ट ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विनोद माणिकराव यांनी केला आहे.
भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे आणि श्रीकांत यादव (Bhushan Pradhan, Madhav Abhyankar, Gauri Nalawade, Shrikant Yadav) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. सध्या गावाकडे असं चित्र निर्माण झालंय की, गावात केवळ म्हातारी लोक दिसतात आणि त्यांची मुलं, नातवंडं नोकरी-उद्योगधंद्यांच्या निमित्ताने शहरात स्थिरावलेली दिसतात. मात्र, तरूणाईनेही आपल्या गावात राहून, गावाला जाणून घेऊन प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं ही तरूण पिढीची जबाबदारी आहे.
गावाच्या भल्यासाठी, विकासासाठी गावातीलच नागरिकांनी एकत्र येऊन गाव सुधारायला हवं असा संदेश या चित्रपट देऊन जातो. कोणतंही चांगलं काम हाती घेतलं की त्यात नानाप्रकारे त्रास देऊन त्यात विघ्न आणणारे लोकंही गावात असतात, अशांच्या विरोधात गावकऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिल्यास गावाचा विकास नक्कीच होईल, असे भाष्य या ट्रेलरमधून करण्यात आले आहे.
गाव, शेती, शेतकरी, त्यांच्याभोवती फिरणारं राजकारण, विकासाचं स्वप्न बघणारा एक भला माणूस, त्याच्या मुलाची गावाकडे परतलेली पावलं यावर बेतलेला ‘गाव बोलवतो’ हा चित्रपट! या चित्रपटात भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे यांच्यासोबतच श्रीकांत यादव, शुभांगी लाटकर, किरण शरद (Bhushan Pradhan, Madhav Abhyankar, Gauri Nalawade along with Shrikant Yadav, Shubhangi Latkar, Kiran Sharad) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संस्कार वाहिनी प्रोडक्शन आणि फिल्मिटेरियन मीडिया वर्क्स निर्मित ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद माणिकराव हे आहेत. तर निर्माते प्रशांत मधुकर नरोडे, शंतनू श्रीकांत भाके हे आहेत, तर व्हिज्युअल बर्ड्स इन्स्टिट्यूट अँड स्टुडिओ, अमित मालवीय, प्रवीण इंदू, गणेश इंगोले, सुधीर इंगळे, तुषार खेरडे, दिनेश राउत हे सहनिर्माते आहेत. २१ मार्चपासून हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.
