केंद्र व राज्यातील सरकार संविधान विरोधी, फोडा व राज्य करा ही भाजपा सरकारची निती…, – काँग्रेस
शनिवारी ८ मार्च रोजी मस्साजोग येथून काँग्रेसच्या सद्भभावना पद यात्रेला सुरुवात

अहिल्यानगर, ७ मार्च २०२५
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची थोर परंपरा आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागावे अशी आपली शिकवण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई ही केवळ सत्तापरिवर्तनासाठी नाही तर व्यवस्था परिवर्तनासाठीही होती, स्वातंत्र्यानंतर देश संविधानाने चालत आला पण आज केंद्र व राज्यातील सरकार हे संविधान विरोधी असून ब्रिटिशांप्रमाणे फोडा व राज्य करा ही या सरकारची निती आहे. सत्ताकारणीसाठी जाती जातीत समाजात विभाजन करून त्यांना एकमेकांविरोधात उभे केले जात आहे त्यामुळे सद्भावना सौहार्दाची पुर्नस्थापना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सद्भावना पदयात्रा काढत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सद्भावना यात्रेला सुरुवात करण्याआधी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज आदर्श ग्राम हिवरे बाजार येथे भेट दिली. सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून गावाच्या विकासाची माहिती घेतली. ग्रामीण विकासाबरोबरच शहराचा विकास करताना सर्वांना बरोबर घेऊन विकास करणे महत्वाचे आहे असेही सपकाळ म्हणाले. त्यानंतर मढी येथे कानिफनाथांच्या समाधीचे, भगवानगड येथे संत श्री. भगवानबाबांच्या समाधीचे आणि नारायणगड येथे भगवान नगद नारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोप्यासाठी साकडे घातले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व तेथील दुकानदारांची भेट घेऊन चर्चा केली.काही दिवसांपूर्वी मढीच्या ग्रामपंचायतीने एक बेकायदेशीर ठराव करून मढीच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या दुकानदारांना दुकाने लावण्याची परवानगी देणार नाही असे म्हटल्याचे व सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने या असंवैधानिक आणि बेकायदेशीर ठरावाचे समर्थन केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आज या दुकानदारांशी चर्चा करून आपण घाबरू नये, काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे असा विश्वास दिला यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अहिल्यानगर जिल्ही काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रविद्रं दळवी, भगवान गडाचे विश्वस्त व काँग्रेस नेते राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस, रामचंद्र आबा दळवी, दादासाहेब मुंडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर अहिल्यानगर व भगवानगड येथे प्रसार माध्यमांशी बातचीत केली, यावेळी काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले की, राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कोयता गँग, रेती गँग,मुरुम गँग, आका, अशा गँग बनल्या आहेत. सत्ता मिळवण्यासाठी जाती धर्मात विष कालवून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे, द्वेष, मत्सर, गुंडागर्दी वाढून सामाजिक समतोल बिघडला असताना सरकार मात्र गप्प आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे. सद्रभावना यात्रा व निवडणूका याची काही संबध नाही. समाजात बिघडलेला ताणाबाणा, वाढलेली विषमता ही चिंताजनक आहे म्हणून राज्यात सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी सद्भावना यात्रेचे आयोजन केले आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
उद्या शनिवारी ८ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग येथे स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून ५१ किलोमीटरच्या सद्भभावना पद यात्रेला सुरुवात करतील. दोन दिवस प्रवास करून ही पदयात्रा रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी बीड येथे पोहोचेल. तिथे सद्भावना मेळाव्याने पदयात्रेची सांगता होणार आहे. या सद्भावना यात्रेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, हिमाचल प्रदेशच्या प्रभारी खासदार रजनीताई पाटील, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना व संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
