मोठ्या बातम्या

आरएसएसच्या भैय्याजी जोशींकडून मुंबई व मराठी भाषेचा अपमान; जाहीर माफी मागा, काँग्रेसने दिला इशारा…

घाटकोपरमध्येही मराठीच बोलतात, संघाच्या भैय्याजी जोशींचा उद्दामपणा खपवून घेणार नाही...


मुंबई, ६ मार्च २०२५

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भैय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा व मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे पुढे असे म्हटले आहे की, मुंबईसह महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, परंतु आरएसएसच्या लोकांना मुंबई व मुंबईतील मराठी भाषा, मराठी जनता यांच्याबद्दल कायमच आकस राहिला आहे. मुंबईतील महत्वाची कार्यालये व संस्था, गुंतवणूक मुंबईबाहेर घेऊन जाण्याचा उद्योग भाजपाच्या राज्यात सतत होत आहे.

आता मुंबईतील मराठी भाषेलाही कमी लेखून गुजरातीसह इतर भाषा लादण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याच मानसिकतेतून भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य आहे. मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर तो कदापी खपवून घेतला जाणार नाही. घाटकोपर हा मुंबईचाच भाग आहे असे असताना घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे म्हणण्याचे धाडस जोशी करुच कसे शकतात.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

घाटकोपरमध्ये लाखो लोक मराठी आहेत व ते मराठीच बोलतात. भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने यावर भूमिका जाहीर करावी. भैय्याजी जोशी यांचे विधान अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का, त्यांनीही भूमिका जाहीर करावी असेही अतुल लोंढे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे ?

मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्यांनी नवा वाद पेटला आहे. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात.” असे वक्तव्य भैय्याजी यांनी केले होते. मात्र यावरूनच वाद पेटला असून संजय राऊतांसह विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. आरएसएस नेत्याच्या या विधानामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी संतापले आहेत. या वक्तव्याचे पडसाद आज विधानभवनात देखील उमटताना दिसले आहेत. हा वाद इतका वाढला की कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!