स्वा.सावरकर प्रेमींकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर व्यक्त होतेय प्रचंड नाराजी
आजारपणाचे कारण देत जन्मस्थळी भेट देणे टाळले

उपमुख्यमंत्र्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थळाला भेट न देणे हि एक निंदनीय घटना
वेगवान नाशिक/ Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी, 17 फेब्रुवारी :-
काल दि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर जनतेची उपस्थिती होती आणि प्रभावी सभा देखील झाली. परंतु, कार्यक्रम आटोपल्यावर अगदी मिनिटभराच्या अंतरावर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देण्याऐवजी “तब्येत ठीक नाही” असे कारण देत त्वरित निघून गेल्याने सावरकर प्रेमींकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय वेळोवेळी देवळाली परिसरात विविध विकासकामांच्या उद्घाटनाला यापूर्वी आले असताना देखील त्यांनी अद्यापही स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट दिलेली नाही हे विशेष.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी देशासाठी केलेले बलिदान, त्यांच्या लेखणीतील तेजस्वी विचार, आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांचे संघर्ष यामुळे त्यांचे कार्य देशवासीयांच्या हृदयात अजरामर आहे. अशा महामानवाच्या जन्मभूमीला भेट देण्याचे महत्त्व एका राजकीय नेत्याने ओळखणे अपेक्षित आहे.
आजची घटना केवळ एका राजकीय व्यक्तीच्या कृतीची नव्हे तर विचारांचीही उपेक्षा दर्शवते. सावरकरांच्या विचारांचा आदर करणे हे केवळ एक राजकीय कर्तव्य नसून, भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा सन्मान करण्याचे प्रतीक आहे. भगूरमध्ये आज पर्यंत राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विविध कारणांनी भेट देत असतात.ते सर्व आधीच स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थळ असलेल्या स्वातंत्र्यवीर.सावरकर वाड्याला भेट देऊन एक नव्या ऊर्जेचा संचार घेऊन जात असतात मात्र अजित पवार यांनी तब्येतीचे कारण पुढे करून या महत्त्वाच्या ठिकाणाला भेट न देणे हे केवळ त्यांच्या वैयक्तिक भावनांचीच नव्हे तर जनतेच्या भावनांचीही उपेक्षा केली आहे.
सावरकरांसारख्या महान क्रांतिकारकांच्या विचारांवर आणि त्यांच्या कार्यावर अभिमान बाळगणाऱ्या भगूरवासीयांसाठी ही गोष्ट मोठी निराशाजनक ठरली. राजकीय नेत्यांनी जनतेशी जोडून राहण्यासाठी त्यांच्या भावनांचा सन्मान करणे गरजेचे आहे.
यापुढे अशा महत्त्वाच्या प्रसंगी सावरकरांसारख्या महामानवांचा योग्य आदर राखला जावा आणि त्यांच्या स्मृतीस्थळांना राजकीय नेत्यांकडून अपेक्षित आदर मिळावा हीच जनतेची अपेक्षा आहे. – मनोज कुवर. सावरकर प्रेमी .
