महाराष्ट्रात: गर्भवती महिलेच्या पोटातील बाळ पण गर्भवती

वेगवान मराठी / मारुती जगधने
बुलढाणा जिल्ह्यातील एका ३२ वर्षीय गर्भवती महिलेच्या नियमित तपासणीदरम्यान, तिच्या गर्भातील बाळाच्या पोटातही एक गर्भ असल्याचे निदान झाले आहे. वैद्यकीय भाषेत या स्थितीला “फिटस इन फिटो” (Fetus in Fetu) असे म्हणतात. ही अत्यंत दुर्मिळ घटना असून, जगभरात अशा केवळ २०० नोंदी आहेत, तर भारतात ९-१० प्रकरणे आढळली आहेत.
“फिटस इन फिटो” ही एक जन्मजात विकृती (Congenital Abnormality) आहे, ज्यामध्ये एका गर्भाच्या विकासादरम्यान दुसरा गर्भ त्याच्या आत समाविष्ट होतो. साधारणतः ५ लाख गर्भवतींमध्ये एक, तर २० लाख गर्भवतींमध्ये एखाद्या महिलेच्या बाबतीत अशी घटना घडते. प्रसूतीनंतर, जर बाळाच्या पोटातील या गर्भामुळे त्रास होत असेल, तर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्याला काढून टाकले जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील या महिलेच्या प्रसूतीनंतर, बाळाच्या पोटातील गर्भ काढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने, तिला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील सर्व सुविधायुक्त रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
पुण्यातही यापूर्वी अशा प्रकारचे प्रकरण समोर आले होते. पिंपरी-चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात, एका १८ महिन्याच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळला होता. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तो गर्भ काढून टाकला.
“फिटस इन फिटो” ही स्थिती अत्यंत दुर्मिळ असली तरी, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सोनोग्राफीद्वारे तिचे निदान करणे शक्य आहे. अशा घटनांमध्ये त्वरित वैद्यकीय हस्तक्षेप आवश्यक असतो.
