काळी फीत कापून का केला गृहप्रवेश? घ्या जाणून…
कर्मकांड टाळून सफाई कामगार महिलेच्या हस्ते गृहप्रवेश...

वेगवान नाशिक /Wegwan Nashik –
विशेष प्रतिनिधी 28 जानेवारी :-
सध्या कोणतेही उद्घाटन करतांना मोठ-मोठे उद्घाटक पाहुणे बोलविले जातात. कर्मकांडांवर मोठा खर्चही केला जातो. पण नाशिकमध्ये गंगापूर रोड येथे एक अनोखा गृहप्रवेश सोहळा पार पडला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी घेतलेल्या नविन वास्तुचे उद्घाटन अनोख्या पध्दतीने केले. कोणत्याही पध्दतीचे पौरोहित्याचे कर्मकांड न करता विधवा सफाई कामगार श्रीमती सुरेखा घोरपडे यांच्या हस्ते काळ्या रंगाची फित कापून गृहप्रवेश करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रथम संत व समाजसुधारक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. वास्तु उभारण्यासाठी अहोरात्र राबलेल्या गवंडी, रंगकाम करणारे, इलेक्ट्रिशियन,सुरक्षा कर्मचारी, सफाई कामगार, वाहनचालक, अंभियंता व वास्तुरचनाकार या कष्टकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.आयुष्यात प्रथमच कुणी दखल घेतल्याने दुर्लक्षित कष्टकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. काही कष्टकरी भावनिक झाले.
धार्मिक कर्मकांडांतुन वाचलेल्या पैशातुन सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी शालेय साहित्य व उपस्थितांना भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास अंनिसचे कार्यकर्ते ,नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांमध्ये या कार्यक्रमाविषयी प्रथम कुतुहल होते. परंतु कार्यक्रमानंतर सर्वांनी आनंद व्यक्त करुन चांदगुडे कुटूंबीयांनी दाखवलेल्या नव्या वाटेची प्रशंसा केली. अंनिस कार्यकर्ते व मित्रमंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.
