परिचय दालनातून होणार ‘ देवराई ‘ ची ओळख

वेगवान नाशिक /Wegwan Nashik-
विशेष प्रतिनिधी 27 जानेवारी –
नाशिकच्या वृक्षसंपदेत अत्यंत दुर्मिळ अशा झाडांची व रोपट्यांची भर घालणाऱ्या सातपूर परिसरातील देवराई येथे येणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी परिचय दालनाचा शुभारंभ काल २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आला.
या दालनाद्वारे निसर्गप्रेमींना जैवविविधता, देवराई ची माहिती, नाशिक देवराई मृत जंगल जिवंत करण्याची संकल्पना, आपल्या जंगलांना असणारे धोके व जंगलाची माहिती कशी करून घ्यावी, थोडक्यात जंगल कसे वाचावे.ह्या दृष्टीने माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत. देवराई परिचय दालनाचे उद्घाटन सहाय्यक वन संरक्षक प्रशांत खैरनार, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी कैलास आहिरे, वन कर्मचारी, जेष्ठ पत्रकार रमेश पडवळ, अमोल पाटील,शामला इलेक्ट्रोप्लेटिंग चे संचालक विनायक गोखले व कर्मचारी, आपलं पर्यावरण संस्थेचे सदस्य व निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या दालनाचा येणाऱ्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रभरातून येणाऱ्या निसर्गप्रेमी नागरिकांना देवराई बघतांना व जाणून घेण्यास सोपं होईल. नाशिक देवराई हे निसर्गप्रेमींसाठी एक परिपूर्ण, निसर्गाचे जिवंत वाचनालय करण्याचा दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. येथील फलक मराठीत माहिती असून या फलकांवर लावण्यात आलेल्या क्यूआर कोड मुळे इंग्रजी आणि हिंदी ,भाषेत पण सदरील माहिती मिळणार आहे.
