बोगस तणनाशकामुळे शंभर एकर कांदा जळुन खाक …
कंपन्या सिल करण्याचें कृषी मंत्री कोकाटे यांचे आदेश,, !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि, २७ जानेवारी — बोगस तणनाशक बनवणार्या कंपन्या त्वरित सिल करण्याचें आदेश राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देत याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. नामदार माणिकराव कोकाटे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला आहे.
तणनाशक फवारणीमुळे देवळा तालुक्यातील मेशी आणि परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याचे जवळपास शंभर एकर क्षेत्रावरील पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. इंडियन पेस्टीसाइड्स लिमिटेड कंपनीच्या ‘क्लोगोल्ड’ या तणनाशकामुळे हे मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी काल रात्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर राज्याचे कृषिमंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
सदर प्रकारामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाले असून, या गंभीर नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या कंपनीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मी दिले आहेत. यासोबतच नुकसान भरपाई तत्काळ देण्याच्या सक्त सूचना संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या.
तणनाशकाचे दोन नमुने खाजगी प्रयोगशाळेत आणि दोन केंद्र शासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले. तसेच, नुकसानग्रस्त जमिनीचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना तणनाशक औषधाचे सखोल परीक्षण करून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा आपला संकल्प कायम असून, योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि जबाबदार कंपनी यांच्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. या पाहणीदरम्यान चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर देखील उपस्थित होते
