नाशिक: तोफेमधून सुटले एका मागुन एक अग्नीगोळे…
देवळालीच्या लष्करी रेंजमध्ये एकीकृत फायर पॉवर 'टोपची' प्रदर्शन
विशेष प्रतिनिधी, दि. 21 जानेवारी –
शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या तोफांमधून एका मागे एक बाहेर पडणारे तोफगोळे, डोळ्यांचे पाते न लावते न लावते तोच अचूक लक्ष भेद करणारी रॉकेट लॉन्चर, बॉम्ब वर्षाव करणारीअत्याधुनिक पिनाका, वज्र तोफ… शत्रूची क्षणात चाळणी करणाऱ्या अत्याधुनिक तुफान मधून होणारा अग्नि गोळ्यांचा वर्षाव अशी चित्त थरारक प्रात्यक्षिके याची डोळा अनुभवताना उपस्थितांची छाती गर्वाने फुलली होती.
निमित्त होते देवळालीतील शिगवे बहुला येथील फायरिंग रेंजमध्ये आज मंगळवार दि 21 रोजी स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने झालेल्या भारतीय तोफखाना विभागाच्या शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचे.
देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने दरवर्षी शस्त्रास्त्र क्षमतेची प्रात्यक्षिके एकीकृत अग्नि शक्ती अभ्यास ‘एक्झरसाइज तोपची’ दरम्यान सादर केली जातात आज मंगळवारी रेंजवर ‘तोपची ‘ही प्रात्यक्षिके सादर झाली. याप्रसंगी स्कूल ऑफ आर्टिलरीचे लेफ्टनंट जनरल व कमांडंट नवनीतसिंह सरना यांसह भारतीय लष्करासह डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज वेलिगंटन, डिफेन्स सर्विसेस टेक्निकल स्टाफ कोर्स, नेपाळ आर्मी स्टाफ चे विद्यार्थी भारतीय सेनेचे वरिष्ठ अधिकारी व सिविल प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यामध्ये ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर सुमारे दहा हजार फुटावरून पॅराग्लायडिंग करणारे लष्करी जवान तर फायरिंग रेंज परिसरात तोफा मोटर्स रॉकेट एव्हिएशन साधने आदींचा संयुक्तिक वापर करत प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये विशेषता के नाईन, वज्र स्वयंचलित गन सिस्टम,155 mm, M777 ULH, 130mn, बोफोर्स, पिनाका, स्वाॅर्म ड्रोन, लाॅयट्रींग म्युनिशन व अत्याधुनिक ड्रोनचे टेक्निकली प्रदर्शन सादर करण्यात आले. हे प्रदर्शन म्हणजे गनर्सचे कौशल्य, क्षमता, दक्षता आणि अत्याधुनिक स्वदेशी बनावटीच्या अग्निशक्ती क्षमतेचे एकीकृत सर्वोत्कृष्ट असे प्रमाण आहे.
यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये मल्टी बॅरेल युएव्ही लॉन्चर सिस्टम, पेहरा ड्रोन सिस्टम, बोअर क्लीनिंग सिस्टम, भारतीय लष्कराकडे असलेले अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा व तोफगोळ्यांमधील अत्याधुनिक अशी व्यवस्थेचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी लष्करासह उपस्थित मान्यवरांनी येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या तोफांसह अन्य साहित्य सोबत फोटो घेण्याचा आनंदही घेतला.