वेगवान नाशिक/Wegwan Nashik
विशेष प्रतिनिधी,12 जानेवारी :-
गत बारा वर्षांपासून देवळालीतील विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सालाबादप्रमाणे देवळाली फेस्टिवल- २०२५ चे आयोजन मंगळवार दि.१४ जानेवारी ते रविवार दि.१९ जानेवारी या सप्ताहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्य आयोजक जीवन गायकवाड यांनी दिली आहे.
गेल्या एक तपापासून विद्यार्थी व कलाकारांच्या कला व खेळ जोपासण्याच्या हेतूने विविध शहरात फेस्टिवलचे आयोजन केले जात असते. त्याच धर्तीवर गेल्या १२ वर्षापासून कला, क्रीडा अन सांस्कृतिक परंपरा या देवळाली फेस्टिवलच्या माध्यमातून जोपासली जात आहे. नागरिकांसह
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा एकमेव उद्देश्य जोपासत देवळाली महोत्सव समिती कार्यरत आहे. यानिमित्ताने होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थी व नागरिक हिरहिरीने सहभाग नोंदवत असतात. यावर्षी मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३०वा. जुने बस स्थानक परिसरात नाशिक सायकलिस्टसह देवळाली भगूर येथील सायकलस्वारांची सायकल थॉन तर खंडेराव टेकडी परिसरात ८:३० वा. इयत्ता ५ वी ते ७ वी व ८ वी ते १२ वी अशा दोन गटात चित्रकला स्पर्धेने या महोत्सवाची सुरुवात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.बुधवार दि.१५ रोजी वडनेर रोडवरील डायमंड कॉटेज सकाळी ९ वा.पासून १७ वर्ष वयोगटातील (फक्त मुले) यांची कबड्डी स्पर्धा पार पडेल. गुरुवार दि.१६ याच ठिकाणी सकाळी ८ वा.पासून शालेय स्तरावरील गडकिल्ले बनवा स्पर्धा होईल. शुक्रवार दि.१७ रोजी शालेय प्राथमिक व माध्यमिक तसेच महाविद्यालयीन गटासाठी सामूहिक नृत्य स्पर्धा कॅन्टोन्मेंट संयुक्त प्राथमिक शाळेत रंगणार आहे. रविवार दि.१९ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. येथील जुने बस स्थानक परिसरात ‘देवळाली रन’ चे आयोजन करण्यात आले आहे. हि रन पार पडल्यानंतर लगेचच विविध मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक
वितरण सोहळा संपन्न होईल. या देवळाली फेस्टिवलसाठी सर्व शाळेतील शिक्षक, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, व्यापारी व बांधकाम व्यावसायिक, रिक्षा व टॅक्सीचालक व मालक यांचे सहकार्य लाभणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या स्पर्धेत सर्व खेळाडू व कलाकारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन देवळाली महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.