नाशिकमध्ये या ठिकाणी पार पडला अनोखा संतपूजन सोहळा
आ.सरोज आहिरे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी लाभल्याने देवळाली मतदारसंघात सुराज्य जगतगुरु द्वाराचार्य हभप डॉ. रामकृष्णदासजी लहवितकर
आ.सरोज आहिरे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी लाभल्याने देवळाली मतदारसंघात सुराज्य
जगतगुरु द्वाराचार्य हभप डॉ. रामकृष्णदासजी लहवितकर
देवळाली कॅम्प :- सध्याची राजकीय देशाची परिस्थिती पाहता देशात देव, धर्म जोपासना करणे आवश्यक आहे. प्रबोधन प्रशासन यांची सांगड घालत समाजाला एकत्र करणे गरजेचे आहे यासाठी वारकरी संप्रदायाने प्रबोधन करतच आहे मात्र आमदार सरोज आहिरे यांच्या सारख्या लोकप्रतिनिधी लाभल्याने देवळाली मतदार संघात सुराज्य स्थापन झाले असून २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण यानुसार ताईंचे कार्य सुरु असल्याचे गौरवोपर उदगार जगतगुरु द्वाराचार्य हभप डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर यांनी काढले.
देवळाली मतदार संघातील विहितगाव वडनेर रोडवरील साई ग्रॅन्ड लॉन्सवर नववर्षाच्या प्रारंभी गुरुवार दि.२ रोजी आमदार सरोज आहिरे यांनी आयोजित केलेल्या वारकरी संतपूजन व संतभोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी द्वाराचार्य डॉ.लहवितकर बोलत होते. याप्रसंगी मदतर संघाबरोबर जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार, वारकरी संप्रदायातील गुणिजनांबरोबर माजी खासदार देविदास पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, भाजपा तालुकाध्यक्ष ऍड.अरुण खांडबहाले, विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, तालुका शेतकी संघाचे सभापती दिलीप थेटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, त्र्यंबकराव गायकवाड, शिवाजी चुंभळे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, यशवंत चुंभळे विलास धुर्जड, साहेबराव पेखळे,विक्रम कोठुळे, कैलास बेंडकुळे आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित वारकऱ्यांसाठी सिन्नर येथील स्वरअलंकार हर्षदजी गोळेसर यांच्या भजनसंध्येतून शास्त्रीय संगीताच्या चालीवर “रामकृष्ण हरी”,” राजस सुकुमार मदनाचा पुतळा”, “धन्य आजी दिन संत दर्शनचा “, “संतभार पंढरीत ” व “वैष्णवा संगती सुख वाटे जिवा” यासारख्या सुमधुर अभंगाचे गायन केले. याप्रसंगी पुढे बोलतांना द्वाराचार्य डॉ. लहवितकर म्हणाले कि, ग्रामीण व शहरी भागाची सांगड घालणाऱ्या मतदार संघात आमदार आहिरे यांच्या रूपाने खरा लोकप्रतिनिधी लाभला असून नुकतेच जरी मंत्रिपदाचे वाटप झाले असले तरी पुढील अडीच वर्षाच्या कालखंडानंतर आमदार सरोज आहिरे या कॅबिनेट मंत्री व्हाव्या हि मतदार संघातील वारकऱ्यांची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद करताना देव त्यांना समाज, राष्ट्र, देव व धर्माचे कार्य करण्यासाठी सामर्थ्य शक्ती व आरोग्य देवो अशा शुभाशीर्वादही दिला. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या अध्यक्षा कांचन जगताप यांनी आजपर्यंत आपण अनेक क्षेत्रामध्ये सोहळे पहिले मात्र एका राजकीय व्यक्तीकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी संतपूजन व संतभोजन हा एक अनोखा सोहळा आहे. पहिल्यांदाच वारकरी संप्रदाय एखाद्या राजकीय व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहिला तर काय होते हा अनुभव सरोज आहिरे यांच्या रूपाने आपण अनुभवला आहे. त्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असून त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले असल्याचे त्यांनी नमूद केले. आभारपर मनोगतातून आमदार आहिरे यांनी वारकरी संप्रदायाच्या आशीवार्दाने आपल्याला पुन्हा जनसेवा करण्याची संधी मिळाली आहे यानिमित्ताने आपण नववर्षाची सुरुवात व देवळाली मदतर संघाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करत असल्याचे नमूद करताना संत निवृत्तीनाथ संस्थानच्या आराखडा हा नक्की अर्थमंत्री अजित पवार हे मंजूर करून देतील असा विश्वास व्यक्त केला. नववर्षाची सुरुवात हि संतांच्या सहवासाने व्हावी हि आपली गेल्या अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली असून हि संतसेवा करण्याचे भाग्य आपल्या नशिबी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उपस्थित संत,कीर्तनकार व वारकरी गुणिजनांचे पाद्यपूजन, उपरणे व संत निवृत्तीनाथांची गाथा देत डॉ.प्रवीण वाघ व सरोज आहिरे यांच्यासह कुटुंबीयांनी पूजन केले व त्यानंतर संत भोजनही झाले. सूत्रसंचालन हभप शिवा महाराज आडके यांनी केले.