वेगवान नाशिक /Wegwan Nashik :-
विशेष प्रतिनिधी, 31 डिसेंबर
नववर्षानिमित्त नाशिक मधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राबविला ‘द, दारूचा नव्हे तर द ,दुधाचा’, उपक्रम : मद्याला विरोध करत केले मोफत दुधवाटप
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत दारु पिऊन करु नये. हा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनोखा उपक्रम राबविला. ‘द, दारूचा नव्हे तर द ,दुधाचा’ हा उपक्रम नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबविला गेला.या अनोख्या उपक्रमाचे नाशिककर नागरिकांनी कौतुक केले आहे.
मागील काही वर्षांपासून कोणत्याही सण, उत्सव , समारंभाच्या निमित्ताने मद्यप्राशन करणे तसेच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करणे ह्या सामाजिक स्वास्थ्याला व पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या गोष्टीं करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. हे जास्त धोकादायक आहे.कोणत्याही व्यसनाने ,व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या कुटुंबाचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. सर्वात धोकेदायक आणि वाईट गोष्ट म्हणजे व्यसन केल्याने व्यसनी व्यक्तीचा विवेक हळूहळू संपुष्टात येतो. त्यावेळी ती व्यक्ती व त्याचे कुटुंब सामाजिक पत प्रतिष्ठा गमावून बसते तसेच त्यातून अंधश्रद्धेला बळी पडण्याची शक्यता वाढते.
नववर्षाचे स्वागत मद्य प्राशन आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून, करण्याची अनिष्ट प्रथा मोठ्या प्रमाणात रूढ होत चाललेली आहे.
म्हणून महाराष्ट्र अंनिसच्या वतीने नाशिक येथील हुतात्मा स्मारकाजवळ ,” द ,दारूचा नव्हे तर द, दुधाचा ” हा उपक्रम नववर्षानिमित्ताने राबवण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा मिलींद वाघ व काॅ राजू देसले यांच्या हस्ते झाले.
यावेळी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींना विशेषतः वाहन चालक आणि युवावर्ग यांना थांबवून, मसाला दुधाचे वाटप करण्यात आले आणि व्यसनांचे व फटाक्यांच्या आतषबाजीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले .
नववर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाचा तसेच आपापल्या आवडीनुसार किमान एक नाविन्यपूर्ण सामाजिक काम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र अंनिसने तयार केलेल्या व्यसनविरोधी प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या उपक्रमामध्ये महाराष्ट्र अंनिसचे डॉ.टी .आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, नितीन बागुल, महेंद्र दातरंगे, ॲड समीर शिंदे, विजय खंडेराव, प्रा. आशा लांडगे, कोमल वर्दे,लता कांबळे, विजय बागूल,प्रभाकर सिरसाठ, प्रताप मोढवे,प्रथमेश वर्दे , बाळासाहेब शिराळ ,आदि कार्यकर्ते उपस्थित सहभागी झालेले होते.