या आधुनिक तीर्थक्षेत्राला कुटुंबासाह अवश्य भेट द्या
ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांचे प्रतिपादन
पुस्तकांचं हॉटेल : आग्रा महामार्गावरील आधुनिक तीर्थक्षेत्र !- डॉ.दिलीप धोंडगे
नाशिक :- ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…’ या जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या विचारवृत्तीला अनुसरून अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळा हा खऱ्या अर्थाने अक्षरसोहळा आहे. म्हणूनच ‘पुस्तकांचं हॉटेल’ हे आग्रा महामार्गावरील आधुनिक तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणाला प्रत्येकाने कुटुंबासह एकदा तरी भेट द्यावी असे गौरवपूर्ण उदगार ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांनी काढले.
नाशिक आग्रा महामार्गावरील दहावा मैल येथील पुस्तकांचं हॉटेलच्या सभागृहात अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अक्षरबंध साहित्य पुरस्कार, साहित्यरत्न, जीवनगौरव आणि दिवाळी अंक पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर पुस्तकांची आई भिमाबाई जोंधळे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सहकार्यवाह ॲड.राजेंद्र डोखळे, मानवधन संस्थेचे डॉ.प्रकाश कोल्हे, गिरणा गौरवचे अध्यक्ष सुरेश पवार, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, प्राचार्य राजेश्वर शेळके, डॉ.अश्विनी बोरस्ते, सेवानिवृत्त न्यायाधीश वसंतराव पाटील, महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक विकास भागवत, व्यासपीठ दिवाळी अंकाचे संपादक हेमकांत पोतदार आदी विविध उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.धोंडगे पुढे म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच संस्कारांची शिदोरी देणारं पुस्तकही महत्त्वाचं आहे. महात्मा फुले आणि महात्मा गांधी या दोन महात्म्यांना पुस्तकांनीच घडवलं. पुस्तक मनापासून वाचण्याबरोबरच त्यात आत्माही ओतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते प्रसिद्ध साहित्यिक प्रा.प्रवीण दवणे यांना ‘अक्षरबंध जीवनगौरव’, कवी ऐश्वर्य पाटेकर यांना ‘अक्षरबंध साहित्यरत्न’ तसेच अक्षरबंध साहित्य पुरस्कार कवी राजेंद्र सोमवंशी ‘गीत नवे गाऊ’ या बालकाव्यसंग्रहाला, मुंबई येथील प्रतिभा सराफ यांच्या ‘अनाकलनीय’ कथासंग्रहाला, ठाणे येथील गीतेश शिंदे यांच्या ‘सीसीटीव्हीच्या गर्द छायेत’ काव्यसंग्रहाला, वैजापूर येथील डॉ.भीमराव वाघचौरे यांच्या ‘जखडण’ कादंबरीला, परभणी येथील केशव वसेकर यांच्या ‘वसा केशवाचा’ या आत्मकथनाला, ठाणे येथील डॉ.निर्मोही फडके यांच्या ‘अनहद’ या ललितसंग्रहाला, साक्री येथील डॉ.नरेंद्र खैरनार यांच्या ‘मंचीय कवितेचा स्वरूपशोध’ या समीक्षाग्रंथाला देण्यात आला. राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक ‘आर्याबाग’, सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ ‘शब्दमल्हार’, सर्वोत्कृष्ट विषय ‘हॅशटॅग’ आणि सर्वोत्कृष्ट मांडणीसाठी ‘अक्षरदान’ या दिवाळी अंकांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार्थींचे पुस्तक ग्रंथदिंडीत ठेवत अनोख्या पद्धतीने पुरस्कार्थींचे मंचावर आगमन करण्यात आले. प्रा.डॉ.निलेश घुगे, आबा शिंदे, सरोजिनी देवरे (मुंबई), सुलोचना भालके, प्रा.दीपाली बोंबले-मोगल या मान्यवरांनी हे पुरस्कार पुरस्कृत केले.
सत्काराला उत्तर देताना अक्षरबंध जीवनगौरव पुरस्कारार्थी प्रा.प्रवीण दवणे यांनी जिभेची रुची आणि वाचनाची अभिरुची यांचा अनोखा संगम पुस्तकाच्या हॉटेलमधून पाहायला मिळाला. हॉटेल व्यवसायाबरोबरच साहित्याचा विचार पुढे नेण्यासाठी अक्षरबंध परिवार सतत पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तर अक्षरबंध साहित्यरत्न पुरस्कारार्थी प्रा.ऐश्वर्य पाटेकर यांनी हा सन्मान म्हणजे पुस्तकांच्या आईचा आशीर्वाद आहे. आम्ही लेखक पुस्तक जगतो; पण ही भीमाआजी पुस्तकांना लेकरासारखं जपते, अशी भावना व्यक्त केली.
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, विठ्ठल संधान, विनायक रानडे, तन्वी अमित, शिवाजीराव ढेपले, बांधकाम व्यावसायिक डी.जे.हंसवानी, प्रशांत कापसे, माणिकराव गोडसे, रामचंद्र शिंदे, सागर निकाळे, प्रशांत धिवंदे, विशाल टर्ले आदींसह राज्यभरातील साहित्यरसिक उपस्थित होते.
प्रास्ताविकात अक्षरबंधचे अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद करून अक्षरबंधच्या उपक्रमांची माहिती दिली. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन तर डॉ.साई बागडे यांनी आभार मानले. ज्येष्ठ कथाकार सप्तर्षी माळी, प्रीती जोंधळे, कल्याणी बागडे, चारुशीला माळी, अक्षय बर्वे, अनिकेत आहेर आदींनी संयोजन केले.