‘या’ ठिकाणी होणार संविधान जागर राष्ट्रीय परिषद
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून तयारी पूर्ण
वेगवान नाशिक/Wegwan Nashik :-
विशेष प्रतिनिधी, 24 डिसेंबर.:-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्था, आयोजित “संविधान जागर राष्ट्रीय परिषदे”चे आयोजन शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी आळंदी येथे करण्यात आले आहे. परिषदेमध्ये देशभरातून मान्यवर उपस्थित राहणार असून दिवसभरात विविध क्षेत्रातून मार्गदर्शन करणार आहेत.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५ वर्षपूर्ती निमित्त संविधान जागर राष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे. ही परिषद आळंदी येथील मुंबई मराठा फ्रुट मार्केट या ठिकाणी होत आहे. परिषदेचे सकाळी साडेदहा वाजता दिल्ली येथील ‘खुदाई खिदमतगार’ या संस्थेचे नेते फैजल खान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी समितीचे राज्याचे अध्यक्ष अविनाश पाटील असून प्रमुख उपस्थिती राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे व राज्य प्रधान सचिव यांची राहणार आहे.यानंतर परिसंवादांना सुरुवात होणार आहे.
दुपारी १२ वाजता प्रथम सत्रात “संविधानाची ७५ वर्षे उपलब्धी आणि आत्मपरीक्षण” या विषयावर पुणे येथील लेखक व संपादक संजय आवटे तसेच संविधान अभ्यासक प्राचार्य नितीश नवसागरे हे आपले विचार मांडतील. अध्यक्षस्थानी मानवाधिकार कार्यकर्त्या तथा मुंबई येथील पत्रकार तिस्ता सेटलवाड या असतील. दुपारी द्वितीय सत्रात अडीच वाजता “संविधानाच्या स्वप्नातील भारत आणि नवनिर्माणाच्या दिशा” या विषयावर बेंगलुरु येथील संविधान अभ्यासक प्रा. खलीद अन्सारी हे विचार मांडतील. अध्यक्षस्थानी अहमदाबाद येथील मानवाधिकार कार्यकर्ते व दलित फाउंडेशन चे संस्थापक मार्टिन मकवाना असतील.
सायंकाळी ५ वाजता राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. सुभाष वारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने समारोप होणार आहे. या वेळेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे हे देखील भविष्यवेध या संदर्भात विचार मांडतील. परिषदेसाठी महाराष्ट्रभरातून तसेच देशातील काही राज्यातून समितीचे कार्यकर्ते तसेच समविचारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य प्रधान सचिव डॉ टि.आर.गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.